
बेस्ट कामगारांसाठी आनंदाची बातमी असून त्यांना दिवाळीआधीच सुधारित वेतनवाढ आणि बोनस मिळणार आहे. ज्या कामगारांनी बेस्ट प्रशासनाबरोबर सामंजस्य करार केला आहे त्या कर्मचाऱ्यांनाच वाढीव वेतन लागू केली जाणार आहे. 15 ऑक्टोबर रोजी नवीन वेतन कर्मचाऱ्यांना मिळेल, असे बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी शुक्रवारी बेस्ट समितीच्या बैठकीत सांगितले. दरम्यान, बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी बेस्टच्या वेतनकराराला विरोध केला असून 9 ऑक्टोबरपासूनच्या संपावर ठाम असल्याची भूमिका घेतली आहे.
बेस्ट कामगार सेना युनियनने बेस्ट प्रशासनाबरोबर केलेल्या ऐतिहासिक परस्पर सामंजस्य करारानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांना 5 ते 12 हजारांदरम्यान घसघशीत वेतनवाढ जाहीर झाली आहे. शिवसेना व भाजपप्रणीत संघटनांसह अन्य काही संघटनांच्या कर्मचाऱ्यांनी सुधारित वेतनवाढ सामंजस्य मान्य केला असून त्यांची संख्या 12 हजारांपर्यंत आहे. त्यामुळे करार मान्य असलेल्यांनाच वाढीव वेतन लागू होणार आहे.
कर्मचाऱ्यांना वेतन कधी देणार व किती कर्मचाऱ्यांना ते मिळणार, सानुग्रह अनुदानाचे काय असे बेस्ट समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय सदस्यांनी विचारले. 15 ऑक्टोबरपासून वाढीव वेतन कर्मचाऱ्यांना मिळेल. त्याआधी 1 ऑक्टोबर रोजी नेमके किती वेतन मिळेल याची माहिती कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे.
कर्मचाऱ्यांच्या वारसांना ‘बेस्ट’मध्ये मिळणार कंत्राटी कामे
‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळेपर्यंत कंत्राटी पद्धतीवर कामे मिळणार आहेत. अशाप्रकारे अनुकंपा तत्त्वावर 600 उमेदवार बेस्टमध्ये नोकरी मिळावी म्हणून प्रतीक्षेत आहेत. या 600 वारसांना सध्या बेस्ट उपक्रमातील विविध कामे कंत्राटी पद्धतीवर देण्यात येतील अशी माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी शुक्रवारी बेस्ट समितीच्या बैठकीत दिली. डीएम इंटरप्रायझेस या कंत्राटदारास कंत्राटी पद्धतीवर 73 लाख 64 हजार 3,032 रुपयांचे काम देण्यात येणार आहे, परंतु उपक्रमात सेवेत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांचे वारस बेस्टमधील नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे डीएम इंटरप्रायझेस या कंत्राटदाराला काम न देता कर्मचाऱ्यांच्या वारसदार मुलांना नोकरीत समावून घ्या अशी मागणी बेस्ट समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय सदस्यांनी केली. दरम्यान, या कर्मचाऱ्यांच्या वारसांनी बचत गट, सहकारी संस्था स्थापन करून बेस्ट उपक्रमाकडे अर्ज करावा. त्यानंतर वर्षभरात या वारसांना कंत्राटी पद्धतीवर कामे देण्यात येतील असे बागडे यांनी यावेळी सांगितले.
बोनस दिवाळीआधी मिळणार
विधानसभा निवडणूक मतमोजणी 24 ऑक्टोबर रोजी आहे. ते संपल्यानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार असल्याची माहिती महाव्यवस्थापक बागडे यांनी दिली.


























































