
नोएडातील एका तरुणाला जॉब पोर्टलवर बायोडेटा टाकणे महागात पडले आहे. सायबर भामट्यांनी या तरुणाला कॅनडामध्ये नोकरी देण्याचे प्रलोभन दाखवत 16 लाखांना चुना लावला आहे. नोएडा पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल करण्यात आली असून 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॅनडातील एका प्रसिद्ध कंपनीचे बनावट ऑफर लेटर बनवून भामट्यांनी ही फसवणूक केली आहे.
सेक्टर 36 मधील चंदनकुमारने गेल्यावर्षी जुलै महिन्यात www.nokri.com वर बायोडेटा टाकला होता. त्यानंतर 1 ऑगस्टला त्याला अनुप गुप्ता नावच्या व्यक्तीचा फोन आला. आपण जॉब पोर्टलचे कर्मचारी असल्याचे त्याने सांगितले. एका आयटी कंपनीसाठी कॉन्फरन्स कॉलद्वारे चंदनकुमारची मुलाखतही घेण्यात आली. त्यानंतर कॅनडातील प्रसिद्ध कंपनीचे बनावट ऑफर लेटरही त्याला पाठवण्यात आले. जॉइंनिग लेटर पाठवण्यासाठी 1 लाख रुपये प्रोसेसिंग शुल्क भरण्यास त्याला सांगण्यात आले. त्यानंतर राजेंद्रसिंह शोखावत याने आपण कपंनीचा एचआर असल्याचे सांगत चंदनला आधी 25 हजार आणि नंतर 70 हजार रुपये जमा करण्यास सांगण्यात आले. कंपनीकडून पुन्हा फोन करून कॅनडामध्ये नोकरी मिळवण्यासाठी तुला 15 लाख रुपये भरावे लागतील असे त्याला सांगण्यात आले. है पैसे चंदनने सुभाष आणि आदित्य यांच्या खात्यात जमा केले. एकूण 16 लाख 64 हजार रुपये या भामट्यांनी चंदनकडून उकळले. त्यानंतर या सर्वांनी आपले फोन बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर चंदनने पोलीस ठाण्याच तक्रार दाखल केली. याबाबत 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.




























































