
विशाखापट्टणम येथे झालेल्या पहिल्या कसोटी लढतीत टीम इंडियाने आफ्रिकेचा 203 धावांनी दारूण पराभव केला. हिंदुस्थानने विजयासाठी दिलेल्या 395 धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेचा डाव 191 धावांमध्ये गारद झाला आणि टीम इंडियाने विजय मिळवला. या विजयासह तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये टीम इंडियाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
पाचव्या दिवशी आफ्रिकेने आपला डाव 1 बाद 11 धावांवरून पुढे सुरू केला. त्यावेळी आफ्रिकेला विजयासाठी 384 धावांची आवश्यकता होती आणि त्यांच्या हातात 9 विकेट्स होत्या. परंतु सकाळच्या सत्रामध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि फिरकी रविंद्र जाडेजा यांच्यासमोर आफ्रिकेचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला.
#INDvSA अश्विनच्या 350 विकेट्स पूर्ण, कुंबळे-भज्जीचा विक्रम मोडला
पाचव्या दिवशी आर. अश्विनने ब्रूनला बाद करत टीम इंडियाला पहिला बळी मिळवून दिला. त्यानंतर शमीने 10 धावांमध्ये आफ्रिकेच्या तीन फलंदाजांना बाद केले. बवूमा (0), डूप्लेसिस (13) आणि डि कॉक (0) यांना शमीने स्वस्तात माघारी घाडले. शमीनंतर जाडेजाने आपला जलवा दाखवत एकाच षटकामध्ये तीन खेळाडू बाद करत सामन्याचे चित्र आणखी स्पष्ट केले. दोघांच्या धारधार गोलंदाजीमुळे लंचपूर्वीच आफ्रिकेचे आठ खेळाडू बाद झाले होते. खेळ थांबला तेव्हा आफ्रिकेच्या 8 बाद 117 धावा झाल्या होत्या.
शेपटाचा तडाखा
लंचनंतर आफ्रिकेचा डाव लगवर गुंडाळण्याचे हिंदुस्थानचे मनसुबे मुथ्थूसामी व पीड्ट या दोघांनी उधळले. दोघांमध्ये तब्बल 90 धावांची भागिदारी झाली. यादरम्यान पीड्सने आपले अर्धशतकही पूर्ण केले. ही जोडी घातक ठऱणार असे वाटत असतानाच शमीने पीड्सला बाद करत हिंदुस्थानच्या विजयाचा मार्ग सुकर केला. त्यानंतर रबाडाने थोडा वेळ संघर्ष केला परंतु शमीने त्यालाही बाद करत हिंदुस्थानला विजयी केले.
रोहित सामनावीर
हिंदुस्थानकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 5, जाडेजाने 4 आणि आर. अश्विनने 1 गडी बाद केला. दोन्ही डावामध्ये शतक (176 आणि 127) झळकावणाऱ्या रोहित शर्माला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
1-0 #TeamIndia win the 1st Test in Vizag by 203 runs #INDvSA @Paytm pic.twitter.com/iFvuKOXPOJ
— BCCI (@BCCI) October 6, 2019
धावफलक –
टीम इंडिया – 502/7 (घोषित) आणि 323/4 (घोषित)
दक्षिण आफ्रिका – सर्व बाद 431 आणि 191




























































