
घरातील कमी प्रकाश, 14 तासांहून अधिक वेळ टीव्ही किंवा मोबाईलच्या स्क्रिनकडे पाहणे आणि हिरव्या पालेभाज्यांचा अभाव यामुळे 12 वर्षांखालील मुलांमध्ये डोळ्यांचे आजार वाढत आहेत. असे असले तरी हिंदुस्थानातील 54 टक्के पालक बालकांच्या डोळे तपासणीकडे ‘डोळेझाक’ करीत आहेत. जागतिक बाल सप्ताहाच्या निमित्ताने ‘सिग्निफाय’ या कंपनीने केलेल्या अभ्यासात ही बाब उघडकीस आली आहे.
‘सिग्निफाय’ने केलेल्या नेत्रतज्ञांच्या सर्वेक्षणातील 58 टक्के तज्ञांनी स्क्रिनकडे पाहण्याच्या वेळेवर बंधने घालण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते डोळ्यांच्या आरोग्यात प्रकाश योजना महत्त्वाची भूमिका बजावते. दिव्यांचे फ्लिकरिंग, अतिप्रखर प्रकाश आणि अयोग्य जागी असलेल्या दिव्यांमुळे डोळ्यांवर दीर्घकालीन परिणाम होत असल्याचे नेत्रतज्ञांनी स्पष्ट केले. सिग्निफाय इनोव्हेशन इंडिया लिमिटेडचे उपाध्यक्ष आणि व्यावसायिक संचालक सुमित जोशी यांनी सांगितले, ‘पालकांनी सर्वोत्तम प्रकाश देणारी लाईटची उत्पादने निवडावीत. त्यामुळे ग्लेअर किंवा फ्लिकरचे प्रमाण कमी होईल. या दोन गोष्टींमुळे डोळ्यांना असहजता येते आणि डोकेदुखीचा त्रास होतो.’
दिव्यांची अशी निवड करा
– वाचनासाठी पांढरा प्रकाश देणारा दिवा.
– विश्रांतीसाठी पिवळा दिवा.
– स्वस्त किंवा अनब्रॅण्डेड दिव्यांपेक्षा डोळ्यांना सहजता देणारे दिवा निवडा.




























































