नादब्रह्माचा उपासक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. मीरा केसकर

संगीताकडे नादब्रह्माची साधना म्हणून पाहणारे मनोहर केसकर. केरळसारख्या परमुलुखात आपलं मराठीपण जपत हिंदुस्थानी संगीत क्षेत्रात मोलाचे कार्य त्यांनी केले. संगीतावरील निष्ठेने त्यांनी केलेल्या कार्यामुळेच संगीतक्षेत्रातलं गुरूपद आपसूक त्यांना बहाल झालं.

गडय़ा आपला गाव बरा ही मराठी माणसाची सर्वसाधारण वृत्ती! या नियमाला असलेल्या सन्माननीय अपवादापैकी एक म्हणता येतील असे प्रा. मनोहर केसकर. हिंदुस्थानी संगीताच्या संदर्भात पायाभूत असे मोलाचे कार्य त्यांनी त्रिवेंद्रममध्ये राहून केले, परंतु त्यांच्या प्रसिद्धी पराङ्मुखभावामुळे महाराष्ट्रातील जनतेस त्यांची माहिती आज पावेतो झाली नाही.

सुमारे 40 वर्षांपूर्वी ते त्रिवेंद्रममध्ये आले. तेव्हा योगायोगाने त्यांची भेट विक्रम साराभाई स्पेस सेंटरमधील डॉ. जनार्दन या संशोधक असलेल्या हौशी सतारवादकाशी झाली आणि मग त्यांच्या जोडीने मनोहरजींनी अनेक व्यासापीठे गाजवली. या कार्यक्रमामधून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची ओळख तेथील जनतेला होत गेली. त्यांच्या निवासस्थानी चालणाऱया इंग्लिशच्या वर्गांबरोबर हिंदुस्थानी कंठसंगीत, तबला, वाद्यसंगीत यांचेही वर्ग सुरू झाले. आजवर 6 ते 60 व वयोगटांतील अनेक होतकरू विद्यार्थ्यांनी हिंदुस्थानी संगीताची तालीम त्यांच्याकडे घेतली आहे.

मनोहरजी केरळ विद्यापीठाच्या संगीत विभागाशीही हिंदुस्थानी संगीताचे व्याख्याते म्हणून सातत्याने संपर्कात होते. तसेच केरळमधील अनेक संगीत दिग्दर्शक, चित्रपट दिग्दर्शक यांनाही त्यांनी मैत्रीपूर्ण सहकार्य केले आहे. विशेष म्हणजे सुमारे 1980 पासून त्यांनी गांधर्व महाविद्यालयाशी समन्वय साधून संगीताचे औपचारीक शिक्षण केरळमधील विद्यार्थ्यांना देण्यास सुरुवात केली. केरळमधील गांधर्व महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र संचालक म्हणून झालेली त्यांची कारकीर्द ही विशेष उल्लेखनीय आहे. गांधर्व महाविद्यालयाच्या भारतभरातील कार्याचा विस्तार दक्षिण भारतात यशस्वीरीत्या करणे, हिंदुस्थानी संगीतासह कर्नाटक संगीताच्या परीक्षा घेऊन तो कार्यभार एकहाती सांभाळणे हे सारे त्यांनी केवळ संगीतावरील निष्ठsने केले आहे.

या सर्व कार्यातून हिंदुस्थानी संगीताची गोडी लागलेली रसिकांची मांदियाळी लवकरच वाढत गेली. 1980 मध्ये ‘तानसेन सूरसंगम’ या संस्थेची स्थापना मनोहरजींनी केली. भारतातून विविध भागांतील यशस्वी, लोकप्रिय तसेच उदयोन्मुख अशा गायक व वादक यांना त्यांनी सादरीकरणासाठी त्रिवेंद्रमला पाचरण केले व त्यांचे गायन, वादन रसिकश्रोत्यांना ऐकवले. यात पंडित जीतेंद्र अभिषेकी, गुंदेचा बंधू यांसारख्या विख्यात गायकांपासून तर कर्नाटकातील एका लहान गावातील अंध गायक चमूसारख्या अप्रसिद्ध कलाकारांचाही समावेश होता.

त्रिवेंद्रममध्ये फार पूर्वीपासून होणाऱया केरला सरकारप्रणीत वार्षिक ‘सूर्या फेस्टिव्हल’ या संगीत समारोहात हिंदुस्थानी संगीताला त्यांनी महत्त्वाचे स्थान मिळवून दिले.

संगीत क्षेत्रातील त्यांचे हे योगदान अत्यंत वाखाणण्यासारखे आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची ओळख करून देऊन, त्याची गोडी लावून, त्याचे अध्यापन करून त्यात प्रावीण्य मिळवलेली कलावंतांची एक पिढी तयार केली. त्यांनी संगीत, तबलावादन या विषयी सातत्याने लेखन केले. तसेच अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या संगीतातील पीएचडीसाठीही त्यांनी मार्गदर्शन केले आहे.

संगीताचा हा वारसा त्यांना घरातूनच मिळाला. व्यवसायाने सरकारी वकील असलेले पिता श्री. नरसिंह गोपाल केसकर आणि लेखिका कवयित्री असलेली, आपल्या मधुर काव्य गायनाने विख्यात झालेली माता सौ. प्रभावती केसकर या दोघांनी शास्त्रीय संगीताची तालीम घेतली होती. त्यामुळे जन्मतःच गाता गळा आणि ऐकता कान मुलांनाही लाभला. ज्येष्ठ भगिनी गायिका सौ. सुनिता धडफळे यांना साथ करता करता श्री. मनोहरजींना तबल्याची आवड निर्माण झाली. कोणी मोठे गुरू लाभले नसले तरी त्यांची साधना मात्र चालूच होती. चेतना कॉलेजमध्ये काही काळ आणि त्यानंतर टांझानियामध्येही काही काळ त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. मात्र त्यांच्याच शब्दात सांगायचे तर ‘दैवगती’ने त्यांचे त्रिवेंद्रम येथे येणे झाले. मनोहरजींनीही त्रिवेंद्रम ही आपली कर्मभूमी म्हणून स्वीकारली. तमीळ आणि मल्याळम या भाषा शिकून त्या भाषेत अस्खलीत व्याख्याने देण्यापर्यंत त्यांनी प्रगती केली.

संगीत क्षेत्रातील या पायाभूत कार्याची प्रेरणा, ही संगीताची आवड अशा प्रकारची वरवरची नसून त्यांनी नेहमीच संगीताकडे नादब्रह्माची साधना म्हणून पाहिले आहे. वेद काळापासून आजवरच्या तालवाद्यांचा, तालांचा त्यांचा सखोल व्यासंग होता. मात्र त्यावरच्या संशोधन कार्याचा व लेखनाचा उपयोग मात्र त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली संगीतावरील प्रबंध लेखन, पीएचडी करणाऱया विद्यार्थ्यांसाठी केला आहे. अत्यंत कठोर व्यवहारवादी अशा आजच्या जगातल्या या संगीतक्रताचे ते निरलस. निरपेक्ष, ज्ञानदान अविश्वसनीय वाटावे असेच आहे. दक्षिणेत गुरुपौर्णिमेच्या गुरुपूजनाची पद्धत प्रचलीत नाही, पण मनोहरजींच्या शिष्यांनी ती विशेषकरून त्यांच्या विषयीच्या प्रेमादराने, त्यांचे अनेक वर्षांपासून नकार ऐकूनही 2010 पासून सुरू केली.

दिनांक 25 डिसेंबर 2019 रोजी अध्यात्मिक बैठक असलेल्या या संगीतसाधकाला देवाज्ञा झाली. अखेरच्या दिवसापर्यंत सतत कार्यरत असलेले 77 वर्षांचे आयुष्य नादब्रह्माच्या उपासनेत व्यतित करून त्यांनी आयुष्याचे सार्थक केले. या उपासनेतून त्यांना स्फुरलेला हा गायत्री मंत्र संगीत साधकांना मार्गदर्शक ठरो.

ॐ नादब्रह्माय विद्महे ॐकाराय धीमही।
तन्नो श्रुतिः प्रचोदया।।

– [email protected]