
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मंगळवारी 3 मार्चपासून इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेला सुरुवात होणार आहे. नाशिक विभागीय मंडळातील चार जिल्ह्यातून 2 लाख 16 हजार 444 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. कॉपी प्रकरणांना आळा घालण्यासाठी विभागात 30 भरारी पथके तैनात राहणार आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय मंडळात नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. विभागातील 2 हजार 726 शाळांमधील 2 लाख 16 हजार 444 विद्यार्थी दहावीची परीक्षा देतील. विभागातील परीक्षा केंद्रांची संख्या 445 इतकी आहे. येत्या 3 ते 23 मार्च या कालावधीत लेखी परीक्षा होणार आहे. यासाठी विभागात एकूण 30 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात प्रत्येक जिल्ह्यात प्राथमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी, निरंतर, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी, डाएट, शिक्षण संचालक यांची पथके तैनात असतील. त्याचबरोबर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व सचिव यांची दोन पथके लक्ष ठेवून असतील, अशी माहिती विभागीय सचिव नितीन उपासनी यांनी दिली.
कॉपीप्रकरणी कडक कारवाईचे संकेत
विद्यार्थी कॉपी करताना आढळल्यास संबंधित पर्यवेक्षकावर गुन्हा दाखल केला जाईल. केंद्रावर पाच किंवा पाचहून अधिक कॉपी प्रकरणे झाल्यास केंद्र संचालकांना जबाबदार धरून कारवाई होणार आहे. त्याहून अधिक कॉपी प्रकरणे झाल्यास केंद्र संचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल.

































































