
संपूर्ण जगासह हिंदुस्थान व महाराष्ट्रात आलेले कोरोना विषाणूचे संकट गंभीर असून त्याचा मुकाबला करण्यासाठी सर्व ती मदत करण्याची आवश्यकता आहे. काँग्रेस पक्षाने ही सातत्याने अशा संकटकाळी कायम मदत केली असून या कठीण प्रसंगी सरकारला आर्थिक मदत करण्यासाठी काँग्रेस पक्षाने विधानसभा व विधान परिषदेतील आमदारांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तसेच लोकसभा व राज्यसभेच्या खासदारांचे एक महिन्याचे वेतन पंतप्रधान मदत निधीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
कोरोनाचे संकट जगभर गंभीर झाले असून देशभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सरकारी पातळीवरून सर्व प्रयत्न केले जात आहे. महाराष्ट्र सरकारचे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीचे काम कौतुकास्पद आहे. या कामात अनेक सामाजिक संस्था, उद्योगपती, तसेच व्यक्तीगत पातळीवरूनही सरकारला आर्थिक मदत करण्यासाठी हजारो हात पुढे आले आहेत. काँग्रेस पक्षाने सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशहिताला व नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. कोरोनाच्या संकट काळात सर्व आमदार व खासदारांनी एक महिन्याचे वेतन मदत निधीसाठी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज्यभरातील जनतेने या काळात घरीच राहून सरकारला मदत करावी. या काळात पोलीस यंत्रणा, आरोग्य कर्मचारी यांसह विविध शासकीय विभागातील कर्मचारी आरोग्यदूत म्हणून काम त्यांचे केलेले काम जनसेवेच्या मदतीसाठी उल्लेखनिय ठरत आहे. त्या सर्वांचे काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिनंदन करत आहे.
काँग्रेस पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत जमा करण्याची इच्छा आहे त्यांनी, महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 या स्वतंत्र बँक खात्यात आपली मदत जमा करावी, असे आवाहनही बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.


























































