संजय उवाच – `लॉक डाऊन’नंतरचे जीवन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातील `लॉक डाऊन’ 14 एप्रिलनंतरही वाढला आहे. कोरोना विषाणू रोखण्याचा हाच एकमेव उपाय आज आपल्यासमोर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे धीरोदात्तपणे जनतेशी संवाद साधत आहेत. पदभार स्वीकारला तेव्हापासून त्यांच्यासमोर फक्त आव्हानांचीच रांग लागली आहे. त्यात हे कोरोना आणि ‘लॉक डाऊन’चे संकट. ‘लॉक डाऊन’ इतक्या लवकर संपणार नाही हे आता नक्की. हिंदुस्थानची 130 कोटी जनता ‘लॉक डाऊन’ संपल्यावर काय करेल, हाच खरा प्रश्न  माझ्यासारख्यांना पडला आहे. गोरगरीब जनतेला, मजूरवर्गाला आज सरकारतर्फे अन्नधान्याची सोय केली जात आहे. ‘लॉक डाऊन’ संपल्यावर हे मोफत अन्नधान्य, रेशन वगैरे गरीबांना मिळणार नाही. त्याच वेळी कोटय़वधी लोक नोकऱया, रोजगाराची साधने गमावून बेरोजगार झालेले असतील. आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी हे लाखो लोक नक्की काय करतील? अमेरिकेत आजमितीस 75 लाख नोकऱ्या गेल्या आहेत. संपूर्ण युरोपात 60 लाख नोकऱ्या संपल्या आहेत. अशा वेळी ‘लॉक डाऊन’नंतर हिंदुस्थानचे चित्र काय असेल, याची कल्पनाही करवत नाही. येथील जनता भूकेकंगाल होईल, भूकबळी होतील, पोटासाठी लोक कायदा हातात घेतील आणि बाळासाहेब ठाकरे ज्या ‘अराजका’चे भाकीत सतत करीत होते ते अराजक देशाच्या रस्त्यांवर उसळताना दिसेल. आज आपले राज्यकर्ते जनतेला घरच्या घरी मास्क कसे बनवायचे याचे मार्गदर्शन करीत आहेत. गेल्या 15 दिवसांत लोकांना चेहऱयावर ‘मास्क’ लावून वावरण्याची सवय झाली आहे. `लॉक डाऊन’नंतर ‘मास्क’ उतरतील तेव्हा अनेक दिवसांनी मित्र, शेजारी, सहकारी यांच्या चेहऱयाचे दर्शन होईल, पण त्या ‘मास्क’च्या मागे जे तोंड आहे त्या तोंडात निदान एकवेळचा तरी घास पडावा इतकीच अपेक्षा आहे. `लॉक डाऊन’नंतर जगण्या-मरण्याचा खरा संघर्ष सुरू होईल. सध्या मोठ्या शहरांत वृत्तपत्रे बंद आहेत. जी वृत्तपत्रे छापली जात आहेत ती लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे एक बरे झाले की या निमित्ताने `समाजसेवा’ करणाऱ्यांचे

sanjay-uvach-intro

फोटो पाहण्याचे संकट टळले आहे. यावर राजस्थान सरकारने चांगला निर्णय घेतला आहे. `लॉक डाऊन’च्या निमित्ताने मदत वाटतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणे हा तेथे गुन्हा ठरवण्यात आला आहे. भारतीय दंड विधान कलम 188 नुसार अशा `फोटोबाज’ मंडळींवर कारवाई करण्याचे आदेश तेथील सरकारने दिले आहेत. `लॉक डाऊन’नंतर हे सर्व `फोटोबाज’ गायब होतील. कारण तेव्हा समाजसेवा परवडणारी नसेल. मुंबईतील काही समाजसेवकांनी `चीन’ला कोर्टात खेचण्यासाठी `युनो’ला म्हणजे संयुक्त राष्ट्रांना पत्र लिहिले आहे. या आंतरराष्ट्रीय समाजसेवादेखील सोशल मीडियावर बहरताना दिसत आहेत. चीनचे काय करायचे ते आता अमेरिका बघून घेईल. येथील समाजसेवकांनी त्याची चिंता करण्याचे कारण नाही. हिंदुस्थानात `लॉक डाऊन’ कधी संपेल आणि `लॉक डाऊन’नंतर जनजीवन कसे असेल, यावर विचार करता भयंकर चित्र समोर येते. नोटाबंदीने उद्ध्वस्त झालेली अर्थव्यवस्था आता सरळ कब्रस्तानात जाऊन पोहोचली आहे. मोठय़ा प्रमाणात वेतन कपात होईल. आर्थिक निर्बंध लादले जातील. नोटाबंदीने लोकांची क्रयशक्ती संपलीच होती, त्यांचे खिसे रिकामेच झाले होते, मात्र आता `लॉक डाऊन’नंतर कपड्यांना खिसेच ठेवायला नको अशी परिस्थिती उद्भवू शकते. महाराष्ट्रात राज्य सरकारने शेतकऱयांना कर्जमाफी केली. मात्र सरकारचे हे सर्व काम कोरोना विषाणूने गिळून टाकले. `लॉक डाऊन’नंतर  शेतकरी आणि कष्टकऱयांना कामाची साधनेच उरणार नाहीत आणि एक सुस्तावलेला नवा देश नव्या विषाणूप्रमाणे जन्म घेताना दिसेल. या सगळ्यांतून मार्ग कसा काढायचा याचे गणित कोणी मांडताना दिसत नाही. देशातील जनता सध्या रोज हात धुवत आहे. `हात नीट धुवा’ असे लोकांना सातत्याने सांगितले जात आहे. `सोशल डिस्टन्स’सारखे नवे शब्द जनतेच्या अंगवळणी पडले आहेत. `लॉक डाऊन’ सुरू असताना सर्वच राज्यकर्ते जनतेला अर्थव्यवस्थेचे भयंकर चित्र दाखवीत आहेत. हा एकप्रकारे इशारा आहे. म्हणजे `लॉक डाऊन’नंतर जनतेला भार वाहावा लागणार आहे. मनाची तयारी करा. तुमचे खिसे नक्कीच कापले जाणार आहेत. अर्थात, खिसे कापणाऱयांना मला इतकेच सुचवायचे आहे की, लोकांच्या स्वकष्टार्जित कमाईवर डल्ला मारू नका. लोकांच्या ठेवी, आयुष्यभराच्या कमाईवर `दरोडे’ टाकून देश चालवू नका. स्वत:च्या हिंमतीवर काही करता येत असेल तर `राज्यकर्ते’ म्हणून घोडय़ावर बसा आणि स्वत:ला मिरवा. देशासाठी त्याग करा, दान करा अशा उपदेशांचीही गरज नाही. देश लोकांच्या त्यागावरच उभा आहे. नोटाबंदीने उद्योगधंदा, अर्थव्यवस्था, व्यापार साफ मारून टाकला. त्याचे परिणाम कोरोनानंतर जास्त जाणवतील. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन वेडे नव्हते यावर सध्याच्या राज्यकर्त्यांना येत्या महिनाभरातच मोहोर उठवावी लागेल. देश संकटात आहे, तो जास्त संकटात जाऊ नये. या संकटाचा उपयोग राजकीय फायद्या-तोटय़ासाठी कोणी केला तर त्यांना देशाचे शत्रू ठरवून बहिष्कृत केले पाहिजे. मृत्यूनंतरचे जीवन कसे असते? यावर मौलाना, साधू-संत, चर्चचे पाद्री नेहमीच प्रवचने देत असतात. चीन, अमेरिका, इटलीसारख्या देशांत मोठमोठ्या `चरी’ खोदून तेथे एकाच वेळी मृतदेहांचे सामुदायिक दफन करण्यात आले. `कोरोना’ने मृत्यूनंतरचे हे जीवन अशा विदारक पद्धतीने दाखविले. `लॉक डाऊन’नंतरचे जीवन तितक्याच भयानक अराजकाचे दर्शन देणारे असेल. राज्यकर्त्यांची खरी कसोटी तेव्हाच लागेल. आता फक्त झलक आहे. दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्रित कोरोनाशी मुकाबला करीत आहेत. त्यामुळे हे दिवसदेखील निघून जातील.

– संजय राऊत

[email protected]

Twitter  – @rautsanjay61