कोपरगावच्या पूर्व भागाला जोरदार पावसाचा तडाखा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील धोत्रे, भोजडे, गोधेगाव, खोपडी, तळेगाव, मळे, दहेगाव, बोलका आदी परिसरात सोमवारी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतात पाणी साठले असून आजूबाजूच्या परिसरातील साठ ते सत्तर घरात पाणी घुसून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतातही गुडघाभर पाणी साचले आहे.

गोदावरी नदी पात्रात नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून 7000 क्युसेक्स वेगाने पाणी सोडले जात आहे. डावा कालव्यातून 125 तर उजवा कालव्यातून 350 क्युसेक्स वेगाने सोडण्यात येत असल्याची माहिती नांदूर मधमेश्वर शाखेचे संदेश कातकडे यांनी दिली. कोपरगाव तालुक्यात पूर्व भागात 3.30 वाजण्याच्या सुमारास पाऊस पडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर पावसाने वेग घेतला. संध्याकाळी 5 वाजेनंतर दमदार पाऊस झाला. साधरण अडीच ते तीन इंचापर्यंत पाऊस झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पावसाने काही भागात पेरण्या वाहून गेल्या. काही शेतकऱ्यांच्या कांदा चाळीत पाणी घुसल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. अंदरसुल, नगरसुल, येवला तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने या भागातील सर्व पाणी उद्यापर्यंत कोपरगाव तालुक्यातील गारदा, नारदा नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणावर येणार आहे. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी सतर्क रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.