कोरोनाचे संकट समूळ नष्ट होवो; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रीअंबाबाई चरणी प्रार्थना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आरोग्य सुविधा वाढविण्यावर शासनाने अधिक भर दिला आहे. कोल्हापुरातही छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालय (सीपीआर) मध्ये सुसज्ज कोरोना वार्ड उपलब्ध झाला आहे. मात्र याचा वापर करण्याची वेळ येवू नये. नागरिक आनंदी आणि निरोगी राहो. कोरोनाचे हे संकट समूळ नष्ट होवो अशी प्रार्थना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज श्रीअंबाबाई (महालक्ष्मी) कडे केली.

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे अत्याधुनिक साधन सामुग्रीसह 14 बेडचा कोरोना वाॅर्ड क्रोम क्लिनीकल रिसर्च ॲन्ड मेडीकल टुरीझम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने देणगी रुपाने तयार करुन दिला आहे. मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी याचे आज सायंकाळी ऑनलाईन लोकार्पण केले. या प्रसंगी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर,प.महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महानगरपालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, प्रभारी अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी.केम्पी पाटील आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय सुविधा शासन आणि लोक सहभागातून अधिक सक्षम करत असुन,यासाठी समाजाचे महत्वपूर्ण योगदान लाभत असल्याबद्दल समाधान व्यक्त करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोनाचे संकट कदाचित गंभीर झाल्यास आरोग्य सुविधा कमी पडू नये,यादृष्टीने अत्याधुनिक आरोग्य सुविधा उभ्या केल्या जात आहेत. मुंबईत तर देशातील सर्वात मोठे कोविड हॉस्पिटल उभे केले आहे. तसेच राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यातही आरोग्य सुविधा सक्षम आणि सुसज्ज केल्या जात आहेत. यापुढील काळात कोरोनाचे संकट अधिक वाढण्याची शक्यता गृहित धरुन शासन आरोग्याच्या बाबतीत अधिक दक्ष आणि सजग आहे. कोरोनाच्या युध्दात प्रशासकीय यंत्रणा विशेषत: आरोग्य यंत्रणा अहोरात्र राबत आहे. यापुढेही आरोग्य विषयक कामात कसूर होणार नाही. उलट कोरोना व्हायरस नागरिकांपर्यंत पोहोचण्याच्या आधीच आपणच माणसांपर्यंत पोहोचून त्यांना सुरक्षा कवच देण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही ते म्हणाले.

कोरोनाचे संकट जरी गंभीर असलं तरीही गडबडून न जाता त्याच्या मुकाबल्यासाठी आरोग्य सुविधा वाढविण्यास प्राधान्य दिले असल्याचे सांगून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कोरोनाने वाईट गोष्टी दिल्या,त्याबरोबरच चांगल्याही गोष्टी दाखविल्या.आरोग्याकडे आणि कुटुंबाकडे कोरोनाने बघायला शिकवले. राज्यात सर्वत्र आरोग्याच्या सुविधा वाढवायला लागलो आहोत. मुंबईत मोठं कोव्हिड हॉस्पिटल उभारण्याबरोबरच केंद्राकडे आणखीन व्हेंटीलेटरची मागणी केली आहे.पीपीई किट,एन- 95 मास्कच्या उपलब्धतेवरही अधिक भर दिला आहे. कोरोनामुळे माणसा माणसात अंतर ठेवणे गरजेचे असले तरीही एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याची परंपरा महाराष्ट्रातील जनतेने जोपासली आहे. एप्रिलमध्ये रक्ताचा तुटवडा होता त्यावेळी शासनाच्यावतीने रक्तदान करण्याचे आवाहन केल्याने, राज्यातील जनतेने मोठ्या प्रमाणावर रक्तदान केल्याने, रक्ताची ही टंचाई दूर झाली. अशा पध्दतीने संकटाशी लढणे महाराष्ट्रा च्या रक्तात असल्याचेही त्यांनी सांगितले.

गेली अडीच, तीन महिने महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरु आहे.मात्र लॉकडाऊन हा शब्द बाजूला ठेवून पुनश्च: हरी ओम आणि मिशन बिगीन अगेनने पुन्हा सुरुवात केल्याचेही‌ मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.यावेळी सीपीआरमध्ये लोक सहभागातून सुसज्ज कोरोना वार्ड उपलब्ध करुन दिल्याबद्दल क्रोमचे कार्यकारी संचालक धनंजय लाड यांना मुख्यमंत्र्यांनी शासनाच्यावतीने धन्यवाद दिले.