‘मटणा’चा प्रश्न सुटणार, देवनार पशुवधगृहाचे ‘मिशन बिगिन अगेन’!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘कोरोना’ लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेल्या पालिकेच्या देवनार पशुवधगृहाचे कामकाज पुन्हा एकदा ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत सुरू होत आहे. यासाठी 2 जुलैपासून देवनार पशुवध गृहाकडून पशु आयातीसाठी परवाना देण्यात येणार असून ३ जुलैपासून पशुवध सुरू होतील. त्यामुळे मुंबईत निर्माण झालेल्या मटणाच्या तुटवड्याचा प्रश्न सुटणार आहे. मात्र हे कामकाज सुरू होत असताना गर्दी टाळून आणि आवश्यक खबरदारी घेऊनच कामकाज केले जाणार आहे. शिवाय धार्मिक कार्यासाठी पशुवध गृहाबाहेर बकरे नेण्याची परवानगी स्थगित करण्यात आलेली आहे.

पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मान्यतेनुसार पालिकेने हा निर्णय घेतला असून व्यावसायिक-मटणविक्रेत्या परवानाधारकांना देवनार पशुवध गृह येथे शेळ्या-मेंढ्या, वराह आणि म्हैस वर्गीय जनावरे आणण्यासाठी मुख्य निरीक्षक विभागातून ‘पशु आयात’ परवाना देण्यात येईल. हा परवाना ‘रविवार ते शनिवार’ असा सात दिवसांसाठी असेल आणि याचा वापर फक्त आयात, वध यासाठीच ग्राह्य धरला जाईल. या परवान्यावर दिनांक, वेळ आणि वैध कालावधी नोंद करण्यात येईल. या परवान्यानुसार शेळी-मेंढी, वराह आणि म्हैस वर्गीय (म्हैस/रेडे) यांची आयात करता येईल. पशुवधानंतर निर्माण होणारी उत्पादने उदा. चामडे, चरबी, यकृत इत्यादींची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी संबंधित परवानाधारकाची असेल. ही सुविधा उपलब्ध करून देताना संबंधित परवानाधारकांनी सोशल डिस्टंसिंग पाळणे, मास्क वापरणे बंधनकारक असेल अन्यथा तातडीने सर्व सुविधा काढून घेण्यात येतील, असेही पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

असे नियम असणार

– परवानाधारकांना शेळ्या-मेढ्यांसाठी प्रतिदिवस फक्त 40 वाहनांना परवानगी असेल. पशु वधाची वेळ सकाळी 11 ते सायंकाळी 7 अशी असेल. दर गुरुवारी पशुवधगृह बंद राहील. देवानार पशुवध गृहाचा परवाना मुंबई शहरात इतरत्र कुठेही जनावरे घेऊन जात येणार नाही. देवनार पशुवध गृहात कोणत्याही प्रकारचा बाजार भरणार नाही. तसेच अन्य राज्यातील अनुज्ञाप्तीधारकांना बकरे खरेदी करण्यास बंदी असेल.

– म्हैस वर्गीय जनावरे (म्हैस/रेडे) यामध्ये प्रतिदिवस 15 तर वराह वर्गासाठी ५ वाहनांना परवानगी असेल. परवाना घेतलेले वाहन येऊ शकत नसेल तर तसे मुख्य निरीक्षक विभागास कळवणे बंधनकारक असेल. पशु वध गृहात जनावरे आणल्यानंतर पशुवैद्यकीय तपासणी झाल्यानंतर बिफ दावण निरीक्षकांकडे नोंद करणे व गोठा आकार भरणे गरजेचे आहे. सदर जनावराला 24 तास विश्रांती दिल्यानंतर पशुवधासाठी परवानगी देण्यात येईल. दररोज 150 म्हैस वर्गीय, 150 वराह जनावरांच्या वधास परवानगी असेल.