
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 2 ते 8 जुलैदरम्यान लॉकडाऊन जाहीर केला आहे. गुरूवारी पहिल्याच दिवशी कुडाळ तालुक्यासह जिल्ह्यात लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. शहरात ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. कुडाळ शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आह. मास्क न लावणाऱ्यांवर कुडाळ नगर पंचायत प्रशासनातर्फे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाकडूनही ठिकठिकाणी वाहन तपासणी मोहीम राबवून विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
सिंधुदुर्गात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोना फैलावाची साखळी तोडण्याची गरज आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गुरूवारपासून सात दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केला आहे. या लॉकडाऊनची कुडाळ शहरात प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी करण्यात आली. शहरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. बॅरिगेटस लावून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.
जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या संपूर्ण लॉकडाऊनच्या विरोधात जिल्हा व्यापारी महासंघाने गुरूवारी जिल्हा बंदची हाक दिली. महासंघाच्या या आवाहनाला प्रतिसाद देत कुडाळ बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. मेडीकल स्टोअर्स वगळता उर्वरित सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे व्यापारी संघटना तालुकाध्यक्ष संजय भोगटे यांनी सांगितले. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हाभर कडकडीत बंद पाळण्यात आला.
































































