कडक लॉकडाऊनमध्येही मध्यप्रदेशातील कामगार खेडमध्ये दाखल, नागरिकांमध्ये घबराट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेऊन जिल्ह्यात 8 जुलै पर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील बाजारपेठा, शाळा – महाविद्यालयासह सर्वच बंद आहे. ऑपरेशन ब्रेक द चेन साठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता कुणालाही जिल्ह्यातुन बाहेर व जिल्ह्यात येण्याची परवानगी नाही. असे असताना ही शासनाचे आदेश पायदळी तुडवत लोटे औद्योगिक वसाहतीतील पुष्कर कंपनीच्या मजुरांची एक बस थेट मध्यप्रदेशहून कंपनीत दाखल झाली असल्याने खळबळ उडाली आहे. ३२ कामगारांना घेऊन ही बस लोटे येथे आलीच कशी ? हा प्रश्न लोटे परिसरातील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

मध्यप्रदेश येथून कामगारांना घेऊन एक बस लोटे येथे आली असल्याचे समजताच संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पुष्कर कंपनीच्या गेटवर धडक दिली. त्यामुळे गडबडलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना थातुरमातुर उत्तरे देऊन कंपनीच्या गेटवरुन काढता पाय घेतला. लोटे औद्योगिक वसाहतीत दिवसेंदिवस कोरोना चा फैलाव वाढत आहे. गेल्या आठ दिवसात एका नामांकित कंपनीत पंधरा कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे औद्योगिक वसाहत व नजीकची गावे भितीच्या छायेखाली आहेत. असे असताना पुष्कर कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या उत्तरांमुळे समाधान न झालेल्या ग्रामस्थांनी खेडचे प्रातांधिकारी सोनोने यांच्याकडे संपर्क साधला. पंरतु या संदर्भात माझ्या कडे कोणतीही माहिती नाही. मी माहिती घेऊन आपणास कळवतो असे त्यांनी सांगितले.

कडक लॉकडाऊन असल्याने एकही वाहन जिल्ह्यात न येऊ देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे मग ३२ कामगारांना घेहून ही बस जिल्ह्यात कशी आली हे एक कोडे आहे. त्या ३२ मजुरांची आरोग्य तपासणी करून त्यांना 28 दिवस क्वारंटाईन करण्यात यावे अशी मागणी उपस्थिती पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी केली आहे. कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधला असताना व्यवस्थापक भास्कर आंब्रे म्हणाले आमच्या कंपनीत सकाळी ९ वाजता ३२ मजुर घेऊन ही बस आज दाखल झाली. पण आम्ही त्या मजुरांना कंपनीच्या एका सभागृहात ठेवले आहे. त्यांची मध्यप्रदेश ला आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. अशी माहिती कंपनी चे अधिकारी प्रभाकर आंब्रे यांनी दिली.