ध्रुवीय अस्वलांची अन्नावाचून तडफड, पृथ्वीवरून प्रजाती नष्ट होण्याची भीती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बर्फाळ प्रदेशात आढळणार्‍या ध्रुवीय अस्वलांचे (पोलर बीयर) अस्तित्व धोक्यात आले आहे.  ध्रुवीय अस्वलांना खायला अन्न मिळत नसल्याने ते आता एकमेकांच्या जिवावर उठले आहेत. त्यातच ग्रीनहाऊस वायूंच्या उत्सर्जनामुळे या शतकाच्या अखेरपर्यंत ध्रुवीय अस्वल मोठ्या प्रमाणात संपून जातील. तसेच 2040 सालापर्यंत त्यांची प्रजनन क्षमता संपुष्टात यायला सुरुवात होईल, असा चिंताजनक अहवाल ‘नेचर क्लायमेट चेंज जर्नल’मध्ये प्रकाशित झाला आहे.

संशोधकांनी, ध्रुवीय अस्वलाच्या 13 प्रजातींचा अभ्यास केला. जगभरात ध्रुवीय अस्वलांच्या अंदाजे 19 प्रजाती असून एकूण संख्या 26 हजार आहे. नॉर्वे ते कॅनडा आणि सायबेरिया इथपर्यंत ध्रुवीय अस्वल पसरलेले आहेत. बर्फाखाली आढळणारे मासे हे त्यांचे प्रमुख अन्न आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत त्यांना मासे शोधण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागत आहेत. त्यामुळेच भुकेने तडफडणार्‍या, अशक्त झालेल्या ध्रुवीय अस्वलांचे फोटो काही दिवसांपूर्वी वायरल झाले होते.

 संशोधकांच्या मते ग्लोबल वॉर्मिंगमुळे बर्फ वितळू लागलेय. त्यामुळे ध्रुवीय अस्वलांची अन्नासाठी वणवण होतेय. एक वेळ अशी येईल की, त्यांना खाद्यच उपलब्ध होणार नाही आणि त्यांची प्रजननाची क्षमता संपून जाईल, असा इशारा संशोधकांनी दिलाय.

ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जनाला आळा घातला नाही तर 2080 सालापर्यंत अलास्का आणि रुसचे सगळे पोलर बीयर संपून जातील आणि या शतकाच्या अखेरपर्यंत त्यांचे पृथ्वीवरचे अस्तित्वच संपेल.