
अभिनेत्री कंगना राणावत हिच्या वांद्रे येथील पाली हिल येथील कार्यालयाची आज पालिकेकडून झाडाझडती घेण्यात आली. तिच्या कार्यालयाच्या बांधकामात काही अनियमितपणा असल्याची शंका आल्याने पालिका अधिकाऱयांकडून ही पाहणी केल्याचे म्हटले जात आहे.
कंगना राणावत सध्या हिमाचल प्रदेशमधील तिच्या घरी असून मुंबईत ती खारमध्ये राहते तर वांद्रे येथील पाली हिलमध्ये तिचे कार्यालय आहे. या कार्यालयाची सध्या रंगरंगोटी सुरू आहे. पालिका अधिकाऱयांनी तिच्या कार्यालयाची पाहणी केली. कार्यालय तसेच कार्यालयातील बांधकामात काही अनियमितपणा किंवा अनधिकृतपणे काही बांधकाम झाले नाही ना, याबाबत माहिती गोळा केल्याचे म्हटले जात आहे. कार्यालयाबरोबरच आजूबाजूची जागा तसेच बंगल्याची पाहणी करून रस्त्यांची मापे पालिका अधिकाऱयांनी घेतल्याचे म्हटले जात आहे.
कंगनाला होम क्वारंटाइन व्हावे लागेल -अतिरिक्त आयुक्त
अभिनेत्री कंगना राणावत 9 सप्टेंबरला मुंबईत दाखल होणार आहे. ती मुंबईत राहत असल्यामुळे ती विमानमार्गे मुंबईत आली तर तिला नियमानुसार होम क्वारंटाईन व्हावेच लागेल. हा केंद्र आणि राज्य सरकारने बनवून दिलेला नियम आहे. आम्ही फक्त त्याची अंमलबजावणी करतो. समजा, ती सात दिवसांपेक्षा कमी दिवस मुंबईत राहणार असेल तर होम क्वारंटाईनचा नियम तिला लागू होणार नाही, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी दिली.


























































