
साधारण तीन महिने होत आले तरी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मृत्यू हा आत्महत्या आहे की हत्या आहे, हे स्पष्ट झालेले नाही. अशातच नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) देशातील एकूण आत्महत्यांची नवीन आकडेवारी जारी केली आहे. या आकडेवारीनुसार 2019 साली एक लाख 39 हजार लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. याचा अर्थ दिवसाला 381 आणि प्रत्येक तासाला 16 आत्महत्या होत आहेत. तसेच देशात महिलांपेक्षा पुरुषांच्या आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे. कौटुंबिक समस्यांना कंटाळून जीवन संपवण्याच्या घटनाही सर्वाधिक आहेत.
आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण म्हणजे खराब आर्थिक स्थिती किंवा बेरोजगारी असते, असा साधारण समज असतो. मात्र एनसीआरबीच्या आकडेकारीनुसार गेल्या वर्षी सर्वाधिक म्हणजे 45 हजार 140 (32.4 टक्के) आत्महत्या या कौटुंबिक समस्यांमुळे झालेल्या आहेत. त्याखालोखाल आजारपणामुळे गेल्या वर्षी 23 हजार 830 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत.
– 2019 साली 97 हजार 613 पुरुष आणि 41 हजार 493 महिलांनी आत्महत्या केल्या.
– सर्वाधिक आत्महत्या 18 ते 30 वर्षे वयोगटातील व्यक्तींनी केल्या आहेत. या वयोगटात 48 हजार 774 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. तर 45 वर्षांवरील वयोगटात 36 हजार 449 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत.



























































