
बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीतील जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. राजद 144, काँग्रेस 70 आणि डावेपक्ष 29 जागांवर लढणार आहेत. महाआघाडीचे नेतृत्व राजद अध्यक्ष तेजस्वी यादव यांच्याकडे असणार आहे. दरम्यान, 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यात मतदान होणाऱया या निवडणुकीत एनडीएविरूद्ध महाआघाडी अशी लढत होणार आहे.
कोरोना महामारी काळात होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणुक असल्याने अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. 243 जागांसाठी तीन टप्प्यात मतदान होईल आणि 10 नोव्हेंबरला निकाल जाहीर होतील.
– रालोओचे जागा वाटप होण्यापूर्वी महाआघाडीने जागा वाटप करून आघाडी घेतली आहे.
– विधानसभेच्या 243 जागांपैकी राजद 144 जागा लढविणार असून, त्यात आमचा मित्रपक्ष असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चा आणि विकासशिल इन्सान पार्टीलाही सामावून घेतले जाईल अशी माहिती राजद अध्यक्ष तेजस्वी यादव यांनी दिली.
– महाआघाडीत काँग्रेस 70 जागांवर निवडणूक लढवणार आहे. माकप 4, भाकप 6 आणि सीपीआय (एमएल) 19 जागांवर निवडणूक लढवेल असेही यादव यांनी सांगितले.
एनडीएविरुद्ध महाआघाडी
– 2015 च्या निवडणुकीत मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा जेडीयु, लालुप्रसाद यादव यांचा राजद आणि काँग्रेस पक्ष एकत्र येऊन महागठबंधन बनविले होते. या महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले. मात्र, 2017 मध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार महाआघाडी बाहेर पडले आणि भाजपबरोबर सरकार बनविले.
– यावेळी एनडीएमध्ये जेडीयू, भाजप आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचा लोजपा आहे.



























































