
पत्नी गर्भवती असल्याने आता चोऱया करायचे बंद कर असे सांगत सासरा त्याला राजस्थानातील प्रसिद्ध दर्ग्यात घेऊन गेला. घरच्यांच्या म्हणण्यानुसार त्याने पुन्हा गुन्हा न करण्याची शपथही घेतली, पण शपथ घेऊन मुंबई त येत नाही तेच त्याने मोबाईलचे दुकान फोडले.
काही दिवसांपूर्वी वडाळ्याच्या संगमनगर येथील एक मोबाईलचे दुकान रात्रीच्या वेळेस फोडण्यात आले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश पासलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय बिराजदार, एएसआय तांबाडे तसेच भोसले, देशमुख, पवार हे पथक गुह्याचा तपास करत होते. दरम्यान, कसून तपास करत पोलिसांनी बुधवारी अस्लम खान (20), हारुण जमील तेली (19) आणि मोहम्मद इम्रान खान (21) या तिघांना पकडले. त्यांच्याकडून चोरीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले. मोहम्मद इम्रान हा टोळीचा म्होरक्या असून मोबाईलची दुकाने फोडून चोऱया करण्यात तो माहीर आहे. त्याची चौकशी केली असता असे समोर आले की, हे आरोपी मोबाईल चोरून नेपाळमध्ये जाऊन विकतात.
रात गयी बात गयी
मोहम्मद इम्रान याची पत्नी गर्भवती असल्याने भविष्याचा विचार करता आता चोऱया बंद कर असे त्याचा सासरा बोलू लागला. सासऱयाने त्याला राजस्थानच्या बहराईच येथील प्रसिद्ध दर्ग्यात नेऊन तशी शपथ घ्यायला लावली. मोहम्मदने तेव्हा गुन्हे करणार नाही अशी शपथही घेतली. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते, पण मुंबईत येताच त्याने मित्रांनी आवाहन करताच वडाळ्याचे ते मोबाईल दुकान फोडले.


























































