पूर्णिया येथील मतदान केंद्रावर मतदारांमध्ये राडा, पोलिसांचा लाठीचार्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहार विधानसभेच्या निवडणुकांच्या अंतिम टप्प्यात पूर्णिया येथे तणाव निर्माण झाल्याचं वृत्त आहे. येथील एका मतदान केंद्रावर हाणामारी झाल्याने पोलिसांना लाठीचार्ज केला आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, पूर्णिया येथे धमदाहा मतदारसंघातील अलिगंज येथील बूथ क्रमांक 282मध्ये मतदारांमध्ये हाणामारी झाली. मतदारांनी केलेल्या आरोपांनुसार येथे शांततेने मतदान सुरू होतं. मात्र, मतदारांची रांग सरळ करण्यासाठी तेथे सुरक्षेसाठी तैनात असलेले कर्मचारी प्रयत्न करत होते.

त्याच वेळी रांगेत उभ्या असलेल्या एका मतदाराच्या पायावर सीआयएसएफच्या जवानाने दांडुका मारला. त्यामुळे वाद निर्माण झाला. वादाची परिणती हाणामारीत झाली. सुरक्षा दलाच्या जवानांवर मतदारांनी हल्ला केला. पाहता पाहता वातावरणात तणाव निर्माण झाला.

ते थांबवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. लाठीचार्ज केल्यानंतर गोंधळ आणखी वाढला. अखेर याला शांत करण्यासाठी सुरक्षा दलांनी हवेत गोळीबार केला. गोळीबाराच्या आवाजाने गोंधळ घालणारे लोक शांत झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आली. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं आहे.

या प्रकरणानंतर ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार जोपर्यंत ताब्यात घेतलेल्या तीन जणांना पोलीस सोडत नाही, तोपर्यंत ते मतदान करणार नाहीत. या प्रकरणी वरिष्ठांना सूचना देण्यात आली असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.