लोणार सरोवर आंतरराष्ट्रीय रामसर पाणथळ क्षेत्र घोषित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगविख्यात लोणार सरोवराला आंतरराष्ट्रीय रामसर पाणथळ क्षेत्राचा(साईट) दर्जा मिळाला. रामसर कन्वेंशन ऑन वेटलँड सेक्रेटरिएट स्वित्झरर्लंड या आंतरराष्ट्रीय संस्थेने लोणार सरोवराचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील पाणथळ क्षेत्रात समावेश केला आहे. यामुळे जगाच्या पर्यावरण नकाशावर लोणारचे नाव कोरले गेले आहे. आंतरराष्ट्रीय संस्थेने घोषित केलेले लोणार हे राज्यातील दुसरे तर देशातील 41व्या क्रमांकावरील पाणथळ क्षेत्र आहे.

लोणार सरोवर हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे ठिकाण असून हे सरोवर पर्यटकांचे मोठे आकर्षण ठरले आहे. या प्राचीन सरोवराची निर्मिती उल्कापातापासून झाली आहे. या सरोवराला नैसर्गिक पाण्याचे झरे नाहीत. फक्त पावसाचे पाणी साचते दरवर्षी सरोवरातील पाण्याचे बाष्प होऊन जमीन चिखलासारखी होते. दलदल होते. पाणी क्षारयुक्त आहे. या सरोवरात काही सायनो बेक्टरीया आणि फायटोप्लांक आढळून येतात. सरोवराच्या आजूबाजूच्या परिसरात पक्ष्यांच्या 160 प्रजाती , सरपटणाऱया प्राण्यांच्या 46 प्रजाती तर 12 प्राण्यांच्या प्रजाती आढळून येतात. या सरोवराची खोली सरासरी 137 मीटर आहे. या सरोवराचा व्यास हा 1.80 किलोमीटर असून त्याचे क्षेत्र हे 113 हेक्टर इतके आहे.

इराणमधील रामसर या शहरात 2 फेब्रुवारी 1971 मध्ये आंतराष्ट्रीय रामसर परिषद पार पडली होती. या परिषदेमध्ये जागतिक स्तरावरील महत्वाच्या पाणथळ साईट घोषित करून या साईटचे संरक्षण व संवर्धन करायचे असा महत्वपूर्ण करार करण्यात आला होता. जैवविविधता व परिस्थितिकीच्या दृष्टीने जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या साइट या रामसर साइट म्हणून घोषित केल्या जातात.

यापूर्वी नाशिक जिह्यातील नांदूर मध्यमेश्वर ही राज्यातील पहिली रामसर पाणथळ साईट म्हणून घोषित आहे. आता लोणार ही राज्यातील अशा प्रकारे घोषित होणारी दुसरी साईट आहे. लोणार सरोवर ही रामसर साईट म्हणून घोषित झाल्याने जगातील पर्यटकांचा ओघ या भागात वाढेल.

लोणारमध्ये निसर्ग पर्यटन विकासाचा आराखडा तयार येईल. त्यादृष्टीने पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली आहे. लोणारचे संरक्षण, संवर्ध व वैशिष्टय़पूर्ण जैवविविधता जपण्यासाठी नागरिकांनीही जागरुक राहिले पाहिजे. – संजय राठोड, वन मंत्री