गुंतवणूकदारांना 2 लाख कोटींचा फटका, शेअर बाजारातील तेजी अचानक गायब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेले काही दिवस उत्साही राहिलेल्या शेअर बाजारात बुधवारी मोठी घसरण झाली. सकाळच्या सत्रात विक्रमी उसळी घेणारा सेन्सेक्स 694 अंकांनी, तर निफ्टी 197 अंकांनी खाली गडगडला. 30 शेअर्सचा सेन्सेक्स 43828 अंकांच्या आणि 50 शेअर्सचा निफ्टी 12858 अंकांच्या पातळीवर बंद झाला. ‘आधी तेजी, मग मंदी’ अशा विचित्र माहोलने गुंतवणूकदारांना तब्बल 2 लाख कोटींहून अधिक फटका बसला.

बुधवारी सकाळी शेअर बाजार खुला झाला, त्यावेळी सेन्सेक्सने 44,825.37 अंकांचा आणि निफ्टीने 13,145.85 अंकांचा विक्रमी स्तर गाठला होता. कोरोना लस येण्याच्या सकारात्मक बातम्या तसेच विदेशी गुंतवणूकदारांचा वाढलेला कल यामुळे सुरुवातीला शेअर बाजारात ही विक्रमी तेजी संचारली होती. मात्र दुसऱया सत्रात गुंतवणूकदारांनी प्रॉफीट बुकिंग केले. त्याचा मोठा फटका बसून गुंतवणूकदारांना तब्बल 2 लाख कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान सोसावे लागले. मंगळवारी बीएसई लिस्टेड कंपन्यांचा मार्पेट कॅप 174.82 लाख कोटी रुपये इतका होता. तो बुधवारी 172.60 लाख कोटींवर खाली आला.

सेन्सेक्सवर केवळ ओएनजीसी आणि पॉवर ग्रीडच्या शेअर्समध्ये तेजी दिसली. कोटक महिंद्रा, ऑक्सिस बॅंक, सनफार्मा आणि एचडीएफसी बॅंकेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. ओएनजीसीमध्ये 6.25 टक्क्यांची तेजी संचारली होती. दुसरीकडे अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.

शेअर बाजाराचा असा झाला चढ-उतार

  • 44,749 अंकांनी खुला झाला.
  • 44,825 अंकांचा विक्रम केला.
  • 43,828 अंकांवर बंद झाला.