मुंबईत कोव्हिशिल्डचा दुसरा टप्पा पूर्ण, केईएममध्ये 95 तर नायरमध्ये 145 चाचण्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाला रोखण्यासाठी आयसीएमआर आणि सिरम इन्स्टिटय़ूटच्या वतीने पालिकेच्या केईएम आणि नायर रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या मानवी चाचणीचा दुसरा टप्पा पूर्ण झाला आहे. केईएममध्ये 95 तर नायरमध्ये 145 स्वयंसेवकांना हा डोस दिला गेला आहे. या स्वयंसेवकांवर मार्च 2021पर्यंत देखरेख ठेवली जाणार आहे.

पालिकेच्या केईएम व नायर रुग्णालयात कोव्हिशिल्डचा डोस देण्याचा दुसरा टप्पा यशस्वी पार पडला आहे. केईएम रुग्णालयात 101 स्वयंसेवकांना कोव्हिशिल्डचा दुसरा डोस दिला जाणार होता. परंतु यापैकी सहा जण यात सहभागी न झाल्यामुळे 95 स्वयंसेवकांना डोस देण्यात आला. पहिल्या व दुसऱया टप्प्यात 95 स्वयंसेवकांना दुसरा डोस दिल्याने केईएम रुग्णालयातील कोव्हिशिल्डची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र तरीही या 95 स्वयंसेवकांवर मार्च 2021पर्यंत वैद्यकीय देखरेख ठेवली जाणार आहे, अशी माहिती केईएमचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली.

नायरमध्ये अंतिम टप्पा सुरू
नायरमध्ये पहिला डोस 145 जणांना दिला गेला तर आतापर्यंत दुसरा डोस 129 जणांना देण्यात आला असून केवळ 16 स्वयंसेवकांना डोस देणे बाकी आहे. या आठवडाभरात हा डोस दिला जाणार आहे. त्यामुळे मुंबईत कोव्हिशिल्डचा दुसरा टप्पाही पूर्ण होईल, अशी माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली.