टोळक्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सहा ते सात वाहनांची तोडफोड करून हातात शस्त्र फिरवत बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगर परिसरात दहशत निर्माण केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विनायक साळवे (वय ३५, रा. बिबवेवाडी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार चार व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अप्पर इंदिरानगर येथील महाडीक चाळ येथे विनायक यांनी त्यांच्या गल्लीत घराजवळ त्यांची मोपोड उभी केली होती. काल रात्री साडेआठच्या सुमारास चारजण आले. त्यांनी हातात धारदार शस्त्र घेऊन दहशत निर्माण केली. विनायक यांच्या दुचाकीच्या मीटर बॉक्स व सीटकव्हरवर मारून नुकसान केले. समीर साळवे यांच्या मोटारसायकलची हेडलाईट फोडली चित्रा पानसरे यांच्या मोटारीच्या काचा फोडून नुसकान केले. परिसरात लावलेल्या तीन ते चार दुचाकींच्या सीटवर व टाकीवर हत्याराने वार करून दुचाकींचे नुकसान केले. त्यानंतर हातामध्ये शस्त्र घेऊन ती हवेत फिरवत मोठ्याने आरडा-ओरडा करून परिसरात दहशत निर्माण केली. त्यामुळे घाबरून नागरिकांनी दारे-खिडक्या बंद केल्या. या घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलिस हवालदार संजय पुणेकर हे अधिक तपास करत आहेत.


































































