
कोपरगाव तालुक्यात वीज वितरण कंपनीची मेन लाईटची तार उसाच्या शेतावर पडल्याने तब्बल सात एकरवरील शेत जळून खाक झाले आहे. या दुर्घटनेमुळे शेतकऱ्याचे तब्बल दहा लाखांचे नुकसान झाले आहे. वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे परिसरात अनेक ठिकाणी विद्युत खांबावरील तारा लोंबकळत आहेत. शेतकऱ्यांनी वेळोवेळी मागणी करूनही वीज वितरण कंपनीकडून याची दखल घेतली जात नाही त्यामुळेच परिसरात असे प्रकार घडत आहे.
चांदेकसारे गट नंबर 1 मधील कैलास सोपान मते, सुनिता कैलास मते,सोपान गंजी मते यांच्या मालकीचा साडेसात एकर ऊस विद्युत वितरण कंपनीची तार तुटल्यामुळे जळून खाक झाला. अचानक लागलेल्या आगीमुळे शेतकरी हवालदिल झाले. परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्याशी संपर्क साधत अग्निशामक दलाला पाचारण केले. शर्तीचे प्रयत्न केल्यानंतरही ऊस आगीपासून आटोक्यात आला नाही.
मते यांनी 265 जातीच्या उसाची लागवड आपल्या साडेसात एकर शेतात केली होती. उसाची नोंद सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यात केली होती. ऐन गळीतास काही दिवस बाकी असतानाच ऊसाला आग लागल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विज वितरण कंपनीच्या विरोधात नुकसान भरपाई मिळावी म्हणून ते न्यायालयात तक्रार दाखल करणार असल्याचे समजते आहे.
































































