
मुंबईत कोरोना आता चांगलाच नियंत्रणात आल्यामुळे पालिकेने सुरू केलेल्या 517 मधील तब्बल 465 कोविड सेंटर बंद करण्यात आली आहेत. सद्यस्थितीत केवळ 52 कोरोना केअर सेंटरमध्ये रुग्ण असून यातील 80 टक्क्यांहून जास्त रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. दरम्यान, कोरोना चाचण्यांच्या प्रमाणात पॉझिटिव्ह आढळण्याचे प्रमाण 35 टक्क्यांवरून 4 टक्क्यांवर आल्याने मुंबईत दैनंदिन आढळणाऱया रुग्णांची संख्याही कमी झाली आहे.
मुंबईत मार्चमध्ये शिरकाव केलेल्या कोरोनाने काही दिवसांतच अनेक ‘हॉटस्पॉट’ निर्माण केले. त्यामुळे पालिकेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले. मात्र पालिकेच्या माध्यमातून कोरोना रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना केल्यामुळे आता कोरोना चांगलाच नियंत्रणात आला आहे. यामध्ये दैनंदिन पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सहाशे ते सातशे आणि मृतांचा आकडा दहा ते 15 पर्यंत खाली आला आहे. ही रुग्णसंख्या घटल्याने मुंबईत पालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या 517 कोरोना केअर सेंटरमधील शेकडो सेंटर टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येत आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य खात्याकडून देण्यात आली.
…तरीदेखील पालिका सतर्क
जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाची अनेक मोठय़ा शहरांत दुसरी लाट आल्याने पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेनेही खबरदारी म्हणून बंद केलेली कोरोना केअर सेंटर पुन्हा सुरू करता येतील अशा स्थितीत ठेवली आहेत. यामध्ये ‘बफर’ प्रकारात म्हणजेच दोन दिवसांत सुरू करतील अशी 37 आणि रिझर्व्ह म्हणजेच आठ दिवसांत सुरू करता येतील अशी 388 कोरोना हेल्थ सेंटर तैनात ठेवली आहेत.
70 टक्के बेड रिक्त
मुंबईत सद्यस्थितीत पॉझिटिव्ह आढळणाऱया रुग्णांमध्ये लक्षणे नसल्याचे प्रमाण 80 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे रुग्णांना कोरोना हेल्थ सेंटरमध्ये दाखल करण्याची गरज भासत नाही. परिणामी पालिकेकडे उपलब्ध असणारे बेड रिक्त राहत आहेत.
सद्यस्थितीत पालिकेकडे एकूण 30 हजार 510 बेड आहेत. यातील तब्बल 21 हजार 311 बेड रिक्त आहेत. तर 9199 बेडवर रुग्ण दाखल आहेत. म्हणजेच पालिकेकडे उपलब्ध असलेल्या बेडपैकी तब्बल 70 टक्के बेड रिक्त आहेत.
विशेष म्हणजे, पालिकेकडे उपलब्ध असणाऱया 1917 आयसीयू बेडपैकी 860, ऑक्सिजन 8314 पैकी 5871 आणि व्हेंटिलेटरमध्ये 1145 पैकी 414 बेड रिक्त असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य खात्याकडून देण्यात आली.


































































