
– दिलीप जोशी ([email protected])
धुसर धुक्यात समोरची वाट दिसेनाशी व्हावी तसं या सरत्या वर्षाचं झालं. 2020 हे हरवलेलं वर्ष लास्ट नव्हे लॉस्ट इयर ठरलं. आपल्या पंचांगनामानुसार वर्षारंभच विकारी नाम संवत्सराने झाले. पुढे त्याला शार्वरीची जोड मिळाली. मात्र नववर्षाच्या आरंभीच चीनमध्ये एका महाभयंकर विकाराची कुणकुण लागली होती. नंतर हळूहळू तिथल्या वुहानमध्ये निर्माण झालेला कोविड-19 किंवा कोरोना विषाणू बघता बघता सबंध जगात पसरला. आपल्याकडे तो येणार नाही असं वाटत असतानाच त्याने सारं जग व्यापलं. दोन्ही गोलार्धांतली दोन ध्रुवांमधली मानवी वस्ती कोविडने धास्तावली व कोटय़वधी व्याधिग्रस्त झाले. लाखोंना प्राण गमवावे लागले. सर्व व्यवहार स्तब्ध झाले. एका विचित्र परिस्थितीत जग सापडलं. न भूतो म्हणजे पूर्वी कधीही न अनुभवलेला ग्लोबल आजार अनेकांना विकारी बनवून गेला.
माध्यमं आणि समाजमाध्यमात एकच चर्चा सुरू झाली. कोरोनाचं संकट किती काळ टिकणार आणि ते कसं घालवणार? प्रगत म्हणवणाऱया देशांनाही या रोगाने सोडलं नाही. सगळय़ा जगाचाच लॉकडाऊन झाला. सर्वांचीच तोंडे मुखपट्टीने (मास्क) बंद केली. सोशल किंवा फिजिकल डिस्टन्सिंग अनिवार्य ठरलं आणि सॅनिटायझर किंवा सॉफ्ट साबण वापरून दिवसातून अनेकदा हात धुण्याची सवय अंगी बाणवावी लागली. प्रत्येक वस्तू सॅनिटाइज करून घेण्यापासून भाजीपालाही नीट धुऊन घेण्याचं काम वाढलं.
आणि अनेकांच्या पोटापाण्याची कामंच बंद पडली. रोजच्या रोज कमावून उदरनिर्वाह करणाऱया, तुटपुंज्या मिळकतीच्या वर्गाची आर्थिक दुर्दशा झाली आणि ज्यांच्याकडे चार पैसे होते त्यांनाही घराबाहेर पडणं कठीण ठरलं. पूर्वी ठरलेली मंगलकार्ये तर पुढे ढकलता आली, पण जवळच्या नात्याच्या कुणाचं बरंवाईट झालं तरी जाता येत नाही अशी व्याकूळ, अगतिक करणारी परिस्थिती उद्भवली.
कोरोनाने जगभर अनेकांचा बळी घेतला. त्यात सामान्यांपासून अनेक मान्यवरही होते. कोविडशी लढा देणारे योद्धेही होते. या सर्वांचं जाणं जिवाला चटका लावून गेलं.
वर्षभरात कॅलेंडरच्या हिशेबाने सणवार झाले, पण ते आले तसेच चूपचाप गेले. जोश, जल्लोष करण्याची ना परिस्थिती आणि ना मनःस्थिती. कुणाला भेटायला बोलावण्याची आणि कुणाच्या भेटीला जाण्याचीही सोय नाही. न जाणो ती व्यक्ती… अशी धास्ती वाटायची. आपल्याविषयीसुद्धा इतरांना अशीच भीती वाटत असणार हेसुद्धा समजायचं. एक विचित्र समंजसपणा मन व्यापून टाकू लागला. पुन्हा तसं करण्यावाचून इलाजही नव्हता. कारण रोगावरचा इलाज सापडून तोही सुरक्षित आहे हे कळेपर्यंत तितिक्षा म्हणजे सहनशीलता संपत आली तरी प्रतीक्षा करणंच भाग होतं.
या अशा पॅण्डॉमिकची कल्पना एकविसाव्या शतकातील प्रगत समजल्या जाणाऱया जगात कोणीच केली नव्हती आणि करणार तरी कशी? उगाचच महासंकटाचं काल्पनिक भूत उभं करायला रोजचं जीवन म्हणजे काही पडद्यावरचा भयपट नव्हे. मात्र अशा आशयाचे भयावह आले तेव्हा तसंच काही थेट जगभर पसरेल अशी कल्पना सामान्यांविषयी कोण आणि कशाला करील? पण जगातील जनजीवनालाच कोरोनाच्या भयपटाने ग्रासलं. त्यात एक सबंध वर्ष हरवलं. अनेकांच्या व्यवसायाचा, शिक्षणाचा बट्टय़ाबोळ झाला.
अर्थात, पहिल्या धक्क्याने कोलमडलेलं जग हळूहळू सावरलं. कधी लॉकडाऊन शिथिल करीत तर कुठल्या देशात पुन्हा लॉकडाऊनचा आधार घेत ते नव्याने उभारी घ्यायचा प्रयत्न करू लागलं. बरेचसे व्यवहार आस्तेकदम पूर्वपदावर येऊ लागले. त्यांना पूर्वीची गती यायला मात्र आणखी काही काळ लागणारच. या हरवलेल्या वर्षाची फलश्रुती निष्फळ अशी नोंदली जाईल पण त्याने वैद्यकीय संशोधकांना आव्हान दिलं. त्यातूनच कोविडरोधक लसनिर्मितीच्या प्रक्रियेला जगभर वेग आला. हिंदुस्थानसह अनेक देशांनी त्यात भरपूर प्रगती केली आणि आता वर्ष संपता संपता काही लसी बाजारात येतायत आणि सर्वसामान्याला टप्प्याटप्प्याने का होईना पण उपलब्ध होतायत हीच या वर्षातली एकमेव सुखद वार्ता म्हणावी लागेल.
मात्र असं आकस्मिक आजाराचं, साथीचं संकट ओढवलं तर काय करायचं त्याचं प्रशिक्षण लहानथोरांपासून सर्वांनाच मिळावं. येणारं वर्ष आरोग्यदायी ठरावं. जग महासाथीतून मुक्त व्हावं. शारीरिक आजार तर दूर व्हावेतच पण मानसिक बळ प्राप्त होऊन फिनिक्स पक्ष्याप्रमाणे नव्या उमेदीने पंख पसरण्याचं आत्मबळ प्राप्त व्हावं. त्यासाठी परस्परांना मदत करावी. वसुधैव कुटुंबकम् हे ब्रीद सार्थ करावं. तो मानवतेचा विषय ठरेल. नववर्षासाठी अगणित शुभेच्छा!





























































