
मेलबर्नच्या मैदानावर रंगलेल्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यात टीम इंडियाने विजयाचा ‘पंच’ लगावला. टीम इंडियाने यजमान ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सने पराभव करत 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. ऍडलेडमध्ये झालेल्या मानहानीकारक पराभवाचा बदला टीम इंडियाने घेतला आणि वर्षाचा शेवट गोड केला.
पहिल्या डावात 131 धावांची आघाडी घेतलेल्या हिंदुस्थानने त्यानंतर दुसऱ्या डावातही कांगारूंची दाणादाण उडवली. तळाच्या फलंदाजांनी केलेल्या प्रतिकारामुळे यजमानांनी डावाने पराभवाची नामुष्की टाळली. मात्र तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची उर्वरित 66 षटकांच्या खेळात 6 बाद 133 अशी दुर्दशा झाली होती.
तिसऱ्या दिवशी नाबाद आलेल्या कमिन्स आणि ग्रीन या जोडीने चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा डाव आणखी लांबवला आणि संघाला 200 धावांचा टप्पा गाठून दिला. ग्रीनने 45, तर कमिन्सने 22 धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या सिराजने सर्वाधिक 3 गडी बाद केले. अश्विन, जडेजा आणि बुमराहने प्रत्येकी 2 गडी बाद केले, तर 1 गडी उमेश यादवने बाद केला. टीम इंडियाने मेलबर्न कसोटीवर मजबूत पकड मिळवली असे असे स्पष्ट दिसत होते.
तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 195 धावांवर रोखल्यानंतर हिंदुस्थानने 115.1 षटकांत 326 धावसंख्येपर्यंत मजल मारून पहिल्या डावात 131 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावातही 66 षटकांत 6 बाद 133 अशी दुर्दशा झाली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पॅमरून ग्रीन 17, तर पॅट कमिन्स 15 धावांवर खेळत होते.
चौथ्या दिवशीचा खेळ सुरू झाल्यानंतर 23 धावांची भर पडली आणि 156 धावांवर पोहोचलेल्या ऑस्ट्रेलियाला कमिन्सच्या रुपाने सातवा धक्का बसला. पुढल्या 44 धावांत कांगारुंचा पूर्ण संघ तंबूत परतला. टीम इंडियाला विजयासाठी 70 धावांचे आव्हान मिळाले.
टीम इंडियाची सुरुवात खराब झाली आणि सलामीवीर मयांक अग्रवाल अवघ्या 5 धावांत परतला. चेतेश्वर पुजाराही 3 धावांत माघारी फिरला. मात्र गिलच्या नाबाद 35 आणि कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नाबाद 27 धावांनी टीम इंडियाला विजय मिळाला. पहिल्या डावात शतक करणाऱ्या रहाणेला सामनावीर पुरस्कार मिळाला.




























































