
चीनसोबतच्या सीमावादावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी महत्त्वाची माहिती दिली आहे. राजनाथ सिंह यांनी स्पष्ट सांगितले की, लडाख सीमेच्या वादासंदर्भात अद्याप कोणताही तोडगा निघालेला नसून स्थिती जैसे थे आहे.
संरक्षण मंत्री म्हणाले की, चीनसोबत चर्चा सुरू आहेत.लवकरच सैन्यस्तरावरील एक होणे बाकी आहे. दरम्यान, आतापर्यंत जी चर्चा झाली त्यात काही ठोस हाती लागलेले नाही. अजूनही स्थिती तशीच असून ती स्थितीही फारशी चांगली नाही, असेही ते म्हणाले.
राजनाथ म्हणाले की, ‘कोणताही देश विस्तारवादी भूमिका स्वीकारात असेल तर हिंदुस्थानकडे त्याला रोखण्याची आणि सीमांचे रक्षण करण्यात सक्षम आहे.’
हिंदुस्थान-चीनमधील सीमावाद अनेक वर्षांपासून सुरू आहे. हा वाद आधीच मिटला असता तर अधिक चांगले झाले असते आणि आज ही स्थिती निर्माण झाली असती. चीन सीमेजवळ इंफ्रास्ट्रक्चर बनवत आहे.मात्र हिंदुस्थानही आपले सैन्य आणि नागरिकांसाठी या भागात काम करत आहे. आपण कुणावर आक्रमण करण्यासाठी नाही तर आपल्या देशातील नागरिकांच्या सुविधांसाठी हे करत आहोत.
हिंदुस्थान आणि चीन दरम्यान एप्रिल महिन्यापासून लडाख सीमेवर तणाव आहे. दोन्ही देशांकडून सीमेवर मोठ्याप्रमाणावर सैन्य तैनात करण्यात आले आहे. आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये चर्चेचे अनेक राऊंड झाले, मात्र त्यातून अद्याप काही निष्पन्न झालेले नाही.
पाकिस्तानला लागून असलेल्या सीमांसंदर्भात संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की, हिंदुस्थानच्या सैन्यात क्षमता आहे की सीमे पार जाऊन ते शत्रूला नष्ट करू शकतील. आपले सैन्य डोळ्यात तेल घालून सीमांचे रक्षण करत आहे आणि कोणी आपल्या जमीनीवर पाय ठेवण्याचा प्रयत्न केलाच तर त्यांना चोखप्रत्युत्तर देण्याची ताकद सैन्यात आहे, असेही ते म्हणाले.
























































