
ओल्ड कस्टममध्ये अधिकारी असलेला मित्र खास ओळखीचा आहे. तो म्हाडाचे फ्लॅट स्वस्तात मिळवून देतो अशी बतावणी करीत नागरिकांची फसवणूक करणारी तिघा जणांची टोळी पंतनगर पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलिसांनी एका महिलेसह दोघांना अटक केली आहे.
घाटकोपरच्या लक्ष्मीनगरमधील विकास सोसायटीत राहणारे मायकल (बदललेले नाव) या रहिवाशाला घर घ्यायचे होते. त्याने तसे आपल्या मित्राला सांगितले होते. त्यानंतर मित्राने चेंबूर येथे राहणाऱया मुनावर सायड याच्यासोबत मायकलची ओळख करून दिली. लतीफ ऊर्फ सिद्धार्थ राजगुरू हा मित्र ओल्ड कस्टम कार्यालयात नोकरीला असून तो स्वस्तात म्हाडाचे घर मिळवून देतो असे मुनावर याने सांगितले. याआधीही त्याने अनेकांना घराचे ताबापत्र मिळवून दिल्याचेही तो म्हणाला. पंतनगर येथे असलेले घर तो सहज म्हाडामध्ये वर्ग करून देईल, परंतु त्यासाठी 15 लाख रुपये लागतील असे मुनावरने सांगितले. स्वस्तात घर मिळत असल्याने मायकलने पैसे देण्याची तयारी दर्शवली.
मुनावर आणि लतीफ यांच्या सांगण्यावरून मायकलने वेळीवेळी आरटीजीएस आणि रोख स्वरूपात दोघांना 8 लाख 60 हजार इतकी रक्कम दिली. त्यानंतर दोघांनी मायकलला यांना रफी अहमद किडवाई मार्ग येथील म्हाडाच्या घराचे ना हरकत प्रमाणपत्र दिले. त्याचप्रमाणे पुर्ला येथे सासूच्या नावावर घर वाटप झाल्याचे पत्रही दिले, परंतु काही महिने जाऊनही घराचा ताबा मिळत नसल्याने मायकल मुनावर आणि लतीफ यांना संपर्प करू लागला, मात्र दोघांचेही फोन बंद येत होते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पंतनगर पोलिसांनी मुनावर, लतीफ यांच्यासह त्यांना म्हाडाची बोगस कागदपत्रे बनवून देणाऱया जेबा फाळके या महिलेला अटक केली. या टोळीने अशा प्रकारे किती जणांना चुना लावला आहे याचा पोलीस शोध घेत आहेत.





























































