
एमए पार्ट 4 (पॉलिटीक्स) च्या अंतिम सत्राच्या परीक्षेचा निकाल मुंबई विद्यापीठाने अद्याप जाहीर केलेला नाही. आँक्टोबर महिन्यात ही परीक्षा घेण्यात आली होती. निकाल रखडल्याने या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता आलेले नाही.
मुंबई विद्यापीठांतर्गत सुमारे 75 ते 80 विद्यार्थ्यांनी एमए पार्ट 4 पॉलिटीक्स या विषयाची अंतिम सत्राची परीक्षा दिली होती. नियमानुसार परीक्षा झाल्यानंतर किमान 45 दिवसांत निकाल जाहीर होणे अपेक्षित असते. मात्र अडीच महिन्यांचा कालावधी उलटूनही या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झालेला नाही. ही परीक्षा दिलेले बहुतांश विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी परदेशातील विद्यापीठात अर्ज करतात. मात्र या परीक्षेचा निकालच त्यांच्या हाती नसल्याने त्यांचे प्रवेश बोंबलले आहेत.
एमए पॉलिटीक्स विभागाकडून विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा डाटा परीक्षा विभागाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र परीक्षा विभागाकडून अद्याप निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. निकाल लावण्याचे काम सुरू असून लवकरात लवकर तो जाहीर केला जाईल, अशी माहिती विद्यापीठातील अधिकाऱयांनी दिली.


























































