
वेगवेगळे व्हिडीओ टाकून लोकांचे मनोरंजन करणारा टिक टॉक स्टार चक्क सराईत चोर निघाला आहे. पैशांची गरज असल्याचे सांगत त्याने मैत्रिणीच्याच घरात चोरी केली. या चोरीप्रकरणी अटक झाल्यानंतर टिक टॉक स्टारने 2011 पासून चोऱ्या करायला सुरुवात केल्याचं कळालं आहे.
अभिमन्यू गुप्ता असे या टिकटॉक स्टारचे नाव आहे. इंस्टाग्रामवर बरीच वर्ष मैत्री असलेल्या खुशबू अगरवाल या त्याच्या मॉडेल – अभिनेत्री मैत्रिणीने त्याला भाड्याने घर मिळेपर्यंत अंधेरी येथील तिच्या फ्लॅटमध्ये राहण्याची परवानगी दिली होती. खुशबू कामानिमित्त बाहेर जायची. 18 ते 22 डिसेंबर दरम्यान ती परदेशात गेली होती. त्यावेळी तिच्या घरात चोरी झाली. पण घरात चोरी झाल्याचे तिच्या 1 जानेवारीला लक्षात आले. तिच्या घरातून 4 लाख 90 हजारांचा ऐवज चोरीला गेल्याचे तिला कळाले. अभिमन्यूशिवाय घरात कोणीच येत जात नसल्याने तिला त्याच्यावर संशय होता. तिने अभिमन्यूला खडसावून जाब विचारला असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली. ही कबुली देत असतानाच त्याने खुशबूला पोलिसांत तक्रार करू नकोस अशी गयावयाही केली होती. मात्र खुशबूने त्याचं न ऐकता पोलिसांना तिच्या घरात चोरी झाल्याची माहिती दिली
पोलिसांनी खुशबू राहात असलेल्या बिल्डींगचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी त्यांना बुरखा घातलेल्या व्यक्ती ज्या दिवशी चोरी झाली त्या दिवशी इमारतीत शिरताना दिसली होती. खुशबूने बुरख्यातील व्यक्तीची चालण्याची ढब आणि तिच्या पायातील बूट पाहून ती व्यक्ती अभिमन्यूच असल्याचे पोलिसांना सांगितले. 2 जानेवारीला पोलिसांनी अभिमन्यूला अटक केली. चौकशीदरम्यान त्याने चोरी केलेला ऐवज, रोख रक्कम ही बाईकच्या सीटखाली लपवून ठेवल्याचे सांगितले. हा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. टीकटॉकवर लाखो फॉलोअर्स असलेल्या अभिमन्यूने चोरीची कबुली दिल्याने त्याची रवानगी कोठडीत करण्यात आली आहे.






























































