
हिंदुस्थान-ऑस्ट्रेलियादरम्यान सिडनीत आजपासून तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याला सुरुवात होणार आहे. या कसोटीत धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा पुनरागमन करणार असून नव्या दमाचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीचेही कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण होणार आहे. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या कथित आरोपातील पाचपैकी चार खेळाडूंचा ‘टीम इंडिया’मध्ये समावेश करण्यात आला आहे.
दोन कसोटीत सलामीला अपयशी ठरलेल्या मयांक अग्रवालला डच्चू देण्यात आला आहे. याचाच अर्थ रोहित शर्मा शुभमन गिलच्या साथीने सलामीला उतरणार हेही निश्चित झाले आहे. चार सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी असल्याने मालिकेत चुरस निर्माण झाली आहे.
क्लेअर पोलोसाक घडविणार इतिहास
कसोटी क्रिकेटच्या इतिहासाला गुरुवारी आणखी एक अध्याय जोडला जाणार आहे. पुरुषांच्या कसोटीत प्रथमच एक महिला क्लेअर पोलोसाक या पंचगिरी करणार आहेत. हिंदुस्थान-ऑस्ट्रेलियादरम्यानच्या तिसऱ्या कसोटीत हा इतिहास घडणार आहे. न्यू साऊथ वेल्सच्या 32 वर्षीय क्लेअर पोलोसाक यांनी याआधी नामिबिया विरुद्ध ओमान या पुरुषांच्या द्वितीय श्रेणीच्या एकदिवसीय सामन्यात मैदानी पंच म्हणून काम पाहिलेले आहे. त्या सिडनी कसोटीत चौथ्या पंचाची भूमिका बजावणार आहेत. क्लेअर पोलोसाक या ऑस्ट्रेलियातील प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही पंचगिरी करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. लढतीदरम्यान नवा चेंडू घेऊन जाणे, मैदानी पंचांना पाणी घेऊन जाणे, उपाहाराच्या आणि चहापानाच्या वेळेत खेळपट्टीची पाहणी करणे, लाईटमीटरच्या साह्याने प्रकाशाची पाहणी करणे अशा प्रकाराच्या जबाबदाऱ्या चौथ्या पंचांना पार पाडाव्या लागतात.
वॉर्नरचे पुनरागमन, पुकोवस्कीचे पदार्पण
सिडनी कसोटीत अनुभवी डेव्हिड वॉर्नर पुनरागमन करणार असून युवा फलंदाज विल पुकोवस्की पदार्पण करणार आहे. हे दोघेच ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात करतील, असे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी सांगितले आहे.
बुमराहच्या साथीला अश्विन-जाडेजा
ईशांत शर्मा, मोहम्मद शमी व उमेश यादव या प्रमुख वेगवान गोलंदाजांच्या गैरहजेरीत जसप्रीत बुमराहने वेगवान गोलंदाजीची धुरा समर्थपणे पेलली आहे. मोहम्मद सिराजने त्याला मोलाची साथ दिली. रविचंद्रन अश्विन व रवींद्र जाडेजा या फिरकीच्या जोडगोळीनेही ऑस्ट्रेलियन फलंदाजांना आपल्या तालावर नाचवले आहे. आता या चौकडीच्या जोडीला नवदीप सैनीही आला आहे. हिंदुस्थानी गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या बलाढय़ फलंदाजीला रोखल्यास अर्धी लढाई जिंकण्यासाठी मदत होणार आहे.
‘टीम इंडिया’त दोन बदल
सिडनी कसोटीसाठी ‘टीम इंडिया’त दोन बदल करण्यात आले आहे. मयांक अग्रवालच्या जागेवर उपकर्णधार रोहित शर्मा, तर जायबंदी झालेला वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या जागेवर नवदीप सैनीला स्थान देण्यात आले आहे. मयांक अग्रवालला मागील पाच कसोटीतील 9 डावांत 147 धावांच करता आल्या. यात त्याने केवळ एकदाच अर्धशतक झळकावले. शुभमन गिलने संधीचे सोने करताना लक्षवेधी कामगिरी केली. त्यामुळे रोहित शर्मा आल्यानंतर संघनिवड समितीने मयांकला बाकावर बसविण्याचा निर्णय घेतला.
सिडनी कसोटीत मास्क अनिवार्य
मेलबर्नमधील बॉक्सिंग डे कसोटी पाहण्यासाठी आलेल्या एका प्रेक्षकाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ती कोरोनाग्रस्त व्यक्ती ज्या स्टॅण्डमध्ये बसली होती, तेथील सर्व प्रेक्षकांना आयसोलेट करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे आता सिडनी कसोटीत खबरदारीचा उपाय म्हणून सर्व प्रेक्षकांसाठी मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. मेलबर्न कसोटीतील आयसोलेट करण्यात आलेले प्रेक्षक जर सिडनी कसोटी पाहण्यासाठी आले, तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
रोहितचे वर्षभरानंतर पुनरागमन
रोहित शर्माने नोव्हेंबर 2019मध्ये बांगलादेशविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता. 32 कसोटी सामन्यांत रोहितने फक्त 5 सामन्यांत सलामीवीर म्हणून फलंदाजी केलेली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी रोहित जायबंदी झाला. याच दुखापतीमुळे त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील पहिल्या दोन कसोटीस मुकावे लागले. ‘टीम इंडिया’चा कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटीनंतर पितृत्व रजेवर गेल्याने एक अनुभवी खेळाडू म्हणून रोहित शर्माचे संघासोबत असणे मानसिकदृष्टय़ाही तितकेच गरजेचे ठरणार आहे.
आजपासून तिसरी कसोटी
हिंदुस्थान – ऑस्ट्रेलिया
सिडनी, पहाटे 5 वाजता
थेट प्रक्षेपण सोनी वाहिनीवर



























































