
मासिक पाळीच्या वेळी काही स्त्रियांना डोकेदुखी, अंगदुखी, झोप न लागणे अशा शारीरिक तक्रारींचा सामना करावा लागतो. यामुळे अस्वस्थता येऊन दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम होतो.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, अशा तक्रारी सध्याची बदलती जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, पेनकिलर घेणे इत्यादी काही कारणांमुळे होऊ शकतात. या काळात महिलांनी काही चुका टाळल्यास यादरम्यान होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासांपासून सुटका होऊ शकते.
थोडं जरी पोट दुखायला की, काही स्त्रिया पेनकिलर घेतात. काही जणींना तर या काळात पेनकिलर घ्यायची सवयच लागते, मात्र या सवयीचा तब्येतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. मासिक पाळीच्या वेळी घेतली जाणारी पेनकिलर तब्येतीसाठी हानिकारक असतात. यामुळे शरीरातील काही चांगले जिवाणू मरतात. यामुळे ह्रदयविकार, अल्सर, किडनी आणि यकृताच्या तक्रारी उद्भवू शकतात.
सुगंधी अत्तर वापरण्याची काहींना सवय असते. पाळीच्या काळात तर काही जणी यावेळी येणारी दुर्गंधी टाळण्यासाठी परफ्युम वापरतात. यामुळे फंगल इन्फेक्शनसारखे त्वचाविकार होऊ शकतात. कारण परफ्युममध्ये सिंथेटिक किंवा रसायनांचा वापर केलेला असतो. याचे दुष्परिणाम त्वचेवर होऊ शकतात.
मासिक पाळी सुरू असताना पौष्टिक आणि पुरेशा प्रमाणात हलका आहार घेणे आवश्यक आहे. यावेळी खाणे टाळल्याने अशक्तपणा येऊ शकतो. बऱ्याचदा अशा दिवसांत जेवणाची इच्छा नसणे, काहीच खावेसे न वाटणे अशा तक्रारी स्त्रिया करतात. तरीही हलका आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश यावेळी आहारात करण्याचा प्रयत्न करावा.
सॅनिटरी नॅपकीन वापरण्याबाबत निष्काळजीपणा करू नये. जाहिरातीला भुलून बऱ्याचदा एकच नॅपकीन दिवसभरात वापरले जाते. ही चूक करू नका. पीरियड्स सुरू असताना दर तीन तासांनी सॅनिटरी नॅपकीन बदलणे आवश्यक आहे. यामुळे संसर्ग आणि दुर्गंधी या दोन्ही तक्रारी टाळता येतील.
पाळीच्या काळात वापरले जाणारे सॅनिटरी नॅपकीन रेयॉन, कॉटन यापासून बनवलेले असतात. यामध्ये हानिकारक केमिकल्स आणि पेस्टीसाइडचा वापर केलेला असतो. याचे दुष्परिणाम महिलांच्या प्रजनन क्षमतेवर होऊ शकतात. यामध्ये असलेले डायऑक्सिन वजायनावर दुष्परिणाम करू शकतात, असे एफडीए (अन्न आणि औषध प्रशासन) चे म्हणणे आहे. हे टाळण्यासाठी नेहमी ऑरगॅनिक कॉटनपासून तयार केलेले सॅनिटरी नॅपकीन्स वापरावेत.
मासिक पाळीच्या वेळी शरीर सुस्त होते, कंटाळा येतो. शारीरिक क्रिया मंदावतात. असे होऊ नये म्हणून हलकाफुलका शरीराला झेपेल असा व्यायाम करावा. व्यायामामुळे येणाऱ्या घामातून शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातात. या काळात शारीरिक संबंध टाळावेत. त्यामुळे संसर्गाचा धोका टाळता येतो.




























































