अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने उडवली दाणादाण ! 50 हजारांचे नुकसान   

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओझरे खुर्द येथे आज दुपारी 2 वाजता आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने चार दुकानांचे सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने दुपारी दुकाने बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ओझरेखुर्द येथे  देवरुख – सायले मार्गावर मराठी शाळेजवळ रस्त्यालगत संजय जागुष्टे यांच्या मालकीची इमारत आहे. त्यात किराणा दुकान, चप्पल दुकान, पिठाची गिरणी आणि दवाखाना असे चार व्यावसायिक असतात.

रोज दुपारी 2च्या आधी जेवणासाठी ही सर्व दुकाने बंद असतात. आज दुपारी दुकाने बंद झाल्यानंतर काही मिनिटांतच वावटळीसारखा जोरदार वारा आला. या इमारतीत शिरल्याने किराणा वगळता उर्वरित तीनही दुकानांचे पत्रे उडवून गेला. हे पत्रे रस्त्यावर पडले आणि फुटले.

किराणा दुकानातील अंतर्गत सामानाचे मोठे नुकसान झाले आहे.  विशेष म्हणजे हा प्रकार झाला त्या अंतरापासून अवघ्या 200 मीटर अंतरात वारा आल्याचा कोणताही मागमूस नाही. त्यामुळे कोकणात महिषासुर म्हटला जाणारा चक्राकार वाराच या दुकानांमधे घुसल्याचे स्पष्ट होत आहे.

या प्रकारात संपूर्ण इमारतीचे सुमारे 50 हजारांचे नुकसान झाल्याचे मालक संजय जागुष्टे यांनी सांगितले. याबाबतीत महसूल प्रशासनाला कळवण्यात आले असून संध्याकाळी पंचनामा होणार आहे.