श्रीरामपूरात चोरांचा धुमाकूळ; दरोड्याचा डाव फसला, चोरट्यांच्या हल्ल्यात महिला जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीरामपूर शहरात चोरांनी धुमाकूळ घातला असून बुधवारी रात्री चोरांनी एका बंगल्याची जाळी कापून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरडाओरडा झाल्याने त्यांचा प्रयत्न फसला. मात्र, दुसऱ्या ठिकाणी चोरट्यांनी महिलेवर धारदार हत्याराने हल्ला करुन रोख रक्कम व दागीने हिसकावत पोबारा केला.

ही घटना गुरुवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडली. कुंती लालबहादूर सुधार (वय 45) ही महिला चोरट्यांच्या हल्लात जखमी झाली असून साखर कामगार हॉस्पीटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. महिलेची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

बुधवारी रात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास सागर भागवत यांच्या बंगल्याच्या खिडकीची जाळी तोडून चोरट्यांनी दरवाजा तोडला. मात्र, चोरटे घरात शिरण्यापूर्वीच भागवत यांनी आरडाओरड केल्याने चोर पळून गेले. त्यानंतर अरविंद डावखर यांच्या मळ्यात एका घरात पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी मारहाण करुन चोरी केली. चोरट्यांनी लोखंडी रॉड, धारदार चाकू, लाकडी दांड्याने मारहाण केल्याने एक महिला जखमी झाली असून येथील कामगार रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

प्रभाग सात परिसरात मंजित दुद्देल सोनार यांचे घर असून त्यांना भेटण्यासाठी आलेले नातेवाईक लोकबहादुर प्रजित सोनार, कुंती लोकबहादुर सोनार (रा. जयराम कॉलनी, पाचोरा, जि. जळगाव) आले होते. रात्री जेवण झाल्यानंतर मंजित कामासाठी घराबाहेर पडला. लोकबहादुर पत्नीसोबत घरी झोपले होते. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास चार अज्ञात चोरट्यांनी मंजित यांच्या घराचा दरवाजा लाथा मारुन हत्याराने तोडला आणि घरात शिरले.

आवाज आल्यानंतर लोकबहादुर जागे झाला. चोरट्यांनी त्यांना मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच कुंती यांच्या डोक्यात लोंखडी रॉडने वार केला. तसेच हातावर चाकुने वार केले. त्यात त्या जखमी झाल्या. चोरट्यांनी लोकबहादुर यांच्या पाकिटातील 11 हजार रुपये आणि त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील 9 हजार रुपयांचे सोन्याचे गंठण हिसकावले. त्यानंतर त्यांनी पोबारा केला. सकाळी जखमी कुंती यांना येथील कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, सहायक पोलीस अधीक्षक समाधान सुरवडे यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. श्वान पथकाला बोलवण्यात आले. श्वानांनी महाले पोदार स्कूल पर्यंत मार्ग दाखविला. शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात मारहाण करुन घरफोडी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.