
पुणे शहरातील विविध भागात खंडणी विरोधी पथकाकडून काल रात्री कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. त्याद्वारे हद्दपार करण्यात आलेल्या सराईतांसह तिघांना अटक करण्यात आले आहे.
खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. त्यानुसार हद्दपार करण्यात आलेला सराईत साहिल अशोक रजपूत (वय – 22, रा. मंगळवार पेठ) याला पिस्तूलासह अटक करण्यात आली. त्याच्याविरूद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात तब्बल 10 गंभीर गुन्हे दाखल आहेत. हद्दपार असतानाही त्याने चतुःशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येउन गंभीर स्वरूपाचे तीन गुन्हे केले होते.
संबंधित गुन्ह्यात साहिल फरार होता. त्याने गुन्हेगार संकेत तारू याच्याकडून पिस्तूल विकत घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याला चौकशीसाठी न्यायालयाच्या परवानगीने कारागृहातून ताब्यात घेतले जाणार आहे. त्याशिवाय कोयता बाळगणाऱ्या वडगाव धायरी परिसरात पकडले आहे. ज्ञानेश्वर संपत मोमीण (वय – 21, रा. वडगाव धायरी) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर दरोडा, बलात्कार, पिस्तूल बाळगण्याचे 5 गंभीर गुन्हे दाखल आहेत.
कुविख्यात गजानन मारणे याचे जंगी स्वागत करणाऱ्या आशिष साबळे (वय – 32) याला स्वारगेट परिसरात ताब्यात घेण्यात आले.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी एक पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, वांजळे, ओंबासे, रपजूत, मराठे, साठे, तूपसौंदर, हेमा ढेबे, चव्हाण, लांडगे, सोनवलकर, केकाण, कांदे, बेले यांच्या पथकाने केली.































































