
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील बिळूर व उमदी परिसरात द्राक्षांचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेतले जाते. सद्यस्थितीत द्राक्षांची आवक वाढल्याने दरात थोडी घट झाली आहे. अशातच व्यापारी वर्ग लॉकडाऊन होणार असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत द्राक्षांची घट होऊन दर कमी होणार असल्याचे सांगून कमी दरात द्राक्षे माल खरेदी करण्याचा प्रकार आढळून येत आहे.
गेल्या वर्षी मान्सूनपूर्व पावसाने तालुक्यातील दक्षिण व पूर्व गावातील काही गावांना गारपिटीने झोडपले होते. यात द्राक्ष बागांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हतबल झाला होता. अशातच कोरोनामुळे सीमा बंदी असल्याने द्राक्षांच्या दरावरदेखील परिणाम झाला होता. यावर्षी एकीकडे उत्पादनात घट झाली आहे, तर दुसरीकडे कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय मार्केट बंद होऊन दर कमी होणार असल्याचे व्यापारी सांगत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. परिणामी उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. तसेच, दरवर्षी शेतकऱ्य़ांची फसवणूक झाल्याचे प्रकार पोलीस ठाण्यात नोंद होतात. प्रसंगी खोटे धनादेश देण्याचेदेखील प्रकार घडतात. तरी शेतकऱ्य़ांनी जागृत राहणे गरजेचे आहे.
सद्यस्थितीत द्राक्षांचे दर आवक जादा झाल्याने घटले आहेत; परंतु मार्चनंतर आवक कमी झाल्यानंतर द्राक्षांचे दर वाढणार असल्याचे संकेत द्राक्षव्यापारी देत आहेत. जतमधल्या द्राक्षांना दक्षिण हिंदुस्थानातील दिल्ली, कोलकाता, गुंटूर, विशाखापट्टणम, बंगळुरू, मद्रास, विजयवाडा या मार्केटमध्ये मोठी मागणी आहे. शरद सोनाका (काळी द्राक्षे) या निर्यातक्षम द्राक्षांना मागणी चांगली आहे. दरदेखील टिकून आहेत. या द्राक्षांना बांगलादेश, मलेशिया या देशांत मागणी आहे. परंतु, इतर द्राक्षांना अपेक्षित असा दर मार्च व एप्रिल या महिन्यांत येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
जत तालुक्यातील शेतकरी कायम अस्मानी संकटांना तोंड देत असतो. गतवर्षीदेखील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्य़ांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे यावर्षी उत्पादनात घट झाली आहे. शिवाय दरदेखील कमी झालेला आहे. अशातच व्यापाऱ्य़ांकडून कोरोनाचा बाऊ करण्याचा, द्राक्षांचा दर कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. उत्पादक शेतकऱ्य़ांनी सर्व बाजारपेठांत चौकशी, सारासार विचार करूनच आपला द्राक्ष माल द्यावा. कोणत्याही फसवणुकीस बळी पडू नये. – अविनाश गडीकर, द्राक्ष उत्पादक शेतकरी, बिळूर.
शेतमालाचे दर पाडल्यास कारवाई – जिल्हाधिकारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊन होणार, अशी भीती घालून द्राक्ष, भाजीपाला उत्पादक यांच्या मालाचे दर व्यापारी पाडत असल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. दरम्यान, द्राक्ष, भाजीपाला उत्पादकांना लॉकडाऊनची खोटी भीती घालून व्यापाऱ्य़ांनी शेतमालाचे दर पाडू नयेत; अन्यथा लॉकडाऊनसंदर्भात अफवा पसरविणाऱ्य़ांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी यापूर्वीच दिलेला आहे.
कोरोनाचा धसका, शेतकरी चिंतेत
शनिवारी तालुक्यातील बिळूर येथे कोरोनाचे 5, तर वाळेखिंडी येथे 4 रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, सांगली जिल्ह्यातही कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याचे दिसून येत आहे. अशीच स्थिती राहिल्यास सीमाबंदी होऊन शेतीमालाच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.
द्राक्षाची जात पूर्वीचा दर सध्याचा दर
(प्रती पेटी) (प्रती पेटी)
माणिकचमन 130 ते 150 100
सुपर सोनाका 200ते 220 200
अनुष्का 200 ते 210 200
शरद सोनाका 280 ते 300 250
























































