
राज्यातील सहकारी बँकांची शिखर बँक असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला 2019-20 या आर्थिक वर्षात तब्बल 325 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. तसेच बँकेच्या स्थापनेपासून 109 वर्षांच्या काळात प्रथमच अनेक उच्चांक गाठल्याने बँकेची आर्थिक स्थिती मजबूत झाली आहे. तसेच बँकेला लेखापरीक्षणात ‘अ’ वर्ग मिळाला आहे.
सहकार विभागाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पार पडली. यावेळी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी मागील आर्थिक वर्षात बँकेने 41 हजार 666 कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल केली असल्याचे सांगितले.
तसेच बँकेचे नॅटवर्थ 2282 कोटी रुपये एवढे झाले असून स्वनिधी 4784 कोटी रुपये झाल्याचे स्पष्ट केले. त्याबरोबरच बँकेला 1345 कोटी रुपयांचा ढोबळ नफा झाला असून सर्व तरतुदी केल्यानंतर 325 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला असल्याचे सांगितले. राज्य बँकेने प्रथमच अनुउत्पादक कर्जासाठी शंभर टक्के तरतूद केली असल्याने एनपीएचे प्रमाण शून्य टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. या सभेला विद्याधर अनास्कर आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजित देशमुख हे प्रत्यक्ष हजर होते, तर सभासद व्हिडीओ कॉन्फरन्ससिंद्वारे सहभागी झाले होते.
सहकारी बँकांसाठी सायबर सिक्युरिटीचा प्लॅटफॉर्म
राज्य बँकेने आरटीजीएस, एनईएफटी व्यवहारांसाठी स्वतंत्र पोर्टल सुरू केले आहे. तसेच सीटीएस क्लिअरिंगसारख्या अनेक सुविधा अन्य सहकारी बँकांना उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यानंतर आता गरजू सहकारी बँकांसाठी सायबर सिक्युरिटी प्लॅटफॉर्म सुरू करणार असल्याची घोषणा विद्याधर अनास्कर यांनी केली.
























































