
विलेपार्ले पूर्वच्या हनुमान रोडवर अनेक झाडांच्या मुळांवर रस्त्याचे काँक्रीट टाकण्यात आल्याने या झाडांना धोका निर्माण झाला आहे. मुळांभोवतीच्या काँक्रीटमुळे झाडे जोराच्या वाऱयासोबत उन्मळून पडण्याचाही धोका आहे. त्यामुळे पालिकेने याबाबत तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी रहिवाशांमधून करण्यात आली आहे.
झाडांची मुळे बंदिस्त झाल्यास झाडांना वाऱयासोबत हलणे कठीण होते. शिवाय झाडे उन्मळून पडण्याचा धोका निर्माण होतो. विलेपार्लेच्या हनुमान रोडवरही असाच प्रकार समोर आला आहे. या रोडवर तत्कालीन महापौर रमेश प्रभू यांच्या पाठपुराव्यातून अनेक झाडे लावण्यात आली होती. ही झाडे 40 वर्षे मार्गाची शोभा वाढवत आहेत. मात्र सद्यस्थितीत या मार्गावरील अनेक झाडांची मुळे रस्त्याच्या काँक्रीटने बंद झाल्यामुळे या झाडांना धोका निर्माण झाल्याचे लीना प्रभू यांनी सांगितले. डिसेंबर 2020 पासून हा प्रकार सुरू आहे. याबाबत पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून झाडे वाचवण्याची मागणी करण्यात आली. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे प्रभू म्हणाल्या. या विभागातील अनेक रस्त्यांवर असाच प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पालिकेने याची दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी अशी मागणीही रहिवाशांमधून करण्यात आली आहे.


























































