
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व राज्यातील महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पित्ताशयावर सोमवारी (दि. 12) दुसरी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. त्यांची प्रकृती स्थिर असून सध्या ते ब्रीच कॅंडी रुग्णालयात डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
पोटदुखीच्या तक्रारीनंतर मागील महिन्यात पवार यांना ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पित्ताशयातील खडा हे त्यांच्या पोटदुखीचे कारण असल्याचे तपासणीनंतर समोर आले होते. डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता. 30 मार्च रोजी रात्री शरद पवार यांच्यावर एण्डोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर 3 एप्रिलला त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. मात्र, दुसरी शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार काल त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांच्यावर लॅप्रोस्कोपी करण्यात आली. डॉ. बलसारा यांनी ही शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर पवारांच्या प्रकृतीत झपाटय़ाने सुधारणा होत असल्याचे मलिक यांनी सांगितले.






























































