मुंबईतील 227 प्रभागांत लसीकरण केंद्रे सुरू करा; पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाला रोखण्यासाठी पालिका, राज्य, केंद्र सरकार आणि खासगी रुग्णालयांमधून लसीकरण सुरू आहे. मात्र, मुंबईची लोकसंख्या इतर शहरांच्या तुलनेत मोठी आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग आणखी वाढवण्यासाठी आणि अधिकाधिक लोकांना सुरक्षित करण्यासाठी पालिकेच्या सर्व 227 प्रभागांत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्रे लवकरात लवकर सुरू करा, असे निर्देश पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे व महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते वडाळा येथील एक्वर्थ पालिका रुग्णालयातील लसीकरण केंद्राचे आज लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. मुंबईत वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिका आणि राज्य सरकार अहोरात्र मेहनत घेत आहे. विविध मोहिमांसह प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच कोरोना नियमांचे उल्लंघन करण्याविरोधात दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. निर्बंधांतही वाढ करण्यात आली असून अत्यावश्यक कारणांसाठी मुंबईकरांनी बाहेर पडावे. राज्य आणि महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. त्याचबरोबर कोरोना चाचण्या आणि लसीकरण वाढवण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून नगरसेवक अमेय घोले यांच्या प्रयत्नाने एक्वर्थ पालिका रुग्णालयात हे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. यावेळी खासदार राहुल शेवाळे, ‘एफ-दक्षिण’ आणि ‘एफ-उत्तर’ प्रभाग समितीचे अध्यक्ष रामदास कांबळे, उपायुक्त (परिमंडळ 2) विजय बालमवार, ‘एफ-दक्षिण’ विभागाचे सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे, मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, उपमुख्य आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा आणि अधिकारी उपस्थित होते.

वडाळा, माटुंग्यात लसीकरण वाढणार 

एक्वर्थ महानगरपालिका कुष्ठरोग रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू केल्यामुळे वडाळा पूर्व व पश्चिम आणि माटुंगा या परिसरातील रहिवाशांना त्याचा लाभ होणार आहे. या ठिकाणी दोन बूथ कार्यान्वित केले असून दररोज 400 पेक्षा अधिक रहिवाशांचे लसीकरण करता येणार आहे. त्यामुळे या परिसरातील लसीकरणाचा वेग वाढणार आहे.

उद्यापासून ऑनलाइन नोंदणी करता येणार

एक्वर्थ महानगरपालिका कुष्ठरोग रुग्णालयातील हे लसीकरण केंद्र आठवडय़ाचे सातही दिवस सुरू राहणार आहे. शुक्रवार, 23 एप्रिलपासून या केंद्रावर लस घेण्यासाठी आरोग्य सेतू, को-विन या अॅपवर ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. त्याचबरोबर रहिवासी आधारकार्ड घेऊन थेट लस घेण्यासाठी येऊ शकतात. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे केंद्र सुरू राहणार आहे तर दुपारी 4 वाजता लसीकरणाची नोंदणी बंद करण्यात येणार आहे.