प्रोफेसर चमनलाल यांचे ऐका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कोरोनाचा हाहाकार उडालेला असतानाही देशाचे कर्तेधर्ते या बिकट परिस्थितीत स्वतःची ‘इमेज’ चमकून घेण्याचा उद्योग करत आहेत. कोरोनाच्या लसीकरणानंतर मिळणाऱया प्रमाणपत्रावरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला फोटो उमटवला असल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.

पश्चिम बंगालमध्ये याच मुद्दय़ावरून ममता बॅनर्जींनी मोदींवर तिखट टीका केली होती. ही टीका एकवेळ राजकीय होती असे समजू शकू, मात्र आता जेएनयूमधील निवृत्त प्राध्यापक असलेल्या चमनलाल यांनी वयोवृद्ध असूनही कोरोनावरची लस घेण्यास चक्क नकार दिला आहे. त्यासाठी त्यांनी सांगितलेले कारण सगळ्यांनाच चिंतन करायला लावणारे आहे. कोरोना लसीनंतर दिल्या जाणाऱया प्रमाणपत्रावर पंतप्रधानांचा फोटो कशासाठी लावला आहे, असा सवाल करत हा फोटो योग्य नसल्याचे प्रोफेसरांचे म्हणणे आहे.

अशा प्रकारची ‘चमकूगिरी’ हा सामाजिक व्यवस्थेला धक्का असल्याचे या 74 वर्षीय प्रोफेसरांचे म्हणणे आहे. जगात अनेक देशांत कोरोनाची लाट येऊन गेली. त्या त्या देशांनी त्यावर आपापल्या परीने मात केली, मात्र कोणत्याही देशातील राष्ट्रप्रमुखाने त्यावर आपला फोटो लावलेला नाही. मग आपल्याकडेच हा अट्टहास कशासाठी? चमनलाल यांचा आवाज देशाच्या सामान्यांचाही आहे. हे ‘फोटोशूट’च्या प्रेमात असलेल्या सत्ताधाऱयांनी लक्षात घ्यायला हवे.