
कोल्हापूर शहरात दररोज अनावश्यक फिरणाऱयांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून, जप्त केलेले वाहन घेण्यास वाहतूक नियंत्रण शाखेसमोर होणारी नागरिकांची गर्दी चिंतेचा विषय बनला आहे. येथे कोरोनासंदर्भात नियमावलीच्या सर्रास उल्लंघनाचे दररोजचे चित्र आहे. आज मोबाईल व्हॅनद्वारे केलेल्या रॅपिड अँटिजेन चाचणीत एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पोलीस दलाचा हलगर्जीपणा समोर आला आहे.
शहरात संचारबंदीतही अत्यावश्यक कामाच्या नावाखाली नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे महानगरपालिका पथक आणि पोलिसांकडून अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई होत आहेत. पोलिसांकडून वाहने जप्त करण्यात येत आहेत. त्यामुळे दंड भरून जप्त केलेली वाहने घेऊन जाण्यासाठी दररोज नागरिकांची दसरा चौक येथील वाहतूक नियंत्रण शाखेसमोर नाहक गर्दी होत आहे. सोशल डिस्टन्सचा अक्षरशः फज्जा उडत असल्याचे येथे सर्रास पाहावयास मिळत आहे. दंड भरण्यास येणाऱया नागरिकांना येथे सॅनिटायजरची व्यवस्थाही नाही.
महापालिकेच्या वतीने शहरात गर्दीच्या ठिकाणी मोबाईल व्हॅनद्वारे रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येत असून, आज या वाहतूक नियंत्रण शाखेत पोलीस आणि नागरिक अशा 72 जणांची चाचणी करण्यात आली. यामध्ये लक्ष्मीपुरी येथील एका नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समोर आल्याने वाहतूक नियंत्रण शाखेसमोरील दररोजची होणारी गर्दी धोकादायक बनली आहे.
वरिष्ठांचे दुर्लक्ष महागात पडण्याची चिन्हे
एकीकडे प्रशासन गर्दी करू नका म्हणत आहे. विविध पोलीस ठाण्यांत तक्रार करण्यास येणाऱया नागरिकांना शक्यतो येऊ दिले जात नाही. गेटबाहेरही थांबू दिले जात नाही, तर दुसरीकडे वाहतूक शाखेसमोरील दररोजची नाहक गर्दी आणि त्याकडे वरिष्ठ अधिकाऱयांचे दुर्लक्ष महागात पडण्याची चिन्हे आहेत.
































































