‘उपद्रवी’ चीनचे राक्षसी रॉकेट उद्या पृथ्वीवर कोसळणार! नासाचे रॉकेटच्या हालचालींवर लक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगाला कोरोनासारख्या जीवघेण्या महामारीच्या खाईत लोटणाऱया चीनचे उपद्रव काही थांबताना दिसत नाहीत. आता चीनने अंतराळात पाठवलेले 21 टन वजनाचे राक्षसी रॉकेट त्याच्यावरचे नियंत्रण सुटल्याने पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता आहे. हे रॉकेट शनिवार 8 मे रोजी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करून मानवी वस्त्यांवर पडून भीषण जीवितहानी होण्याची भीती अमेरिकन संरक्षण तज्ञांनी व्यक्त केली आहे.

चीनचे हे भरकटलेले राक्षसी रॉकेट शनिवारी पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता आहे. जवळपास 21 टन वजनाचे हे रॉकेट घनदाट लोकसंख्या असलेल्या शहरांवर  कोसळू शकते. यामध्ये अमेरिकेचे न्यूयॉर्क, स्पेनचे माद्रिद, चीनची राजधानी बीजिंगचा समावेश आहे. मात्र, शास्त्रज्ञांकडून अद्यापही नेमक्या कोणत्या ठिकाणी रॉकेट कोसळेल  हे सांगण्यात आलेले  नाही.

100 फूट लांब आणि 16 फूट रुंद असलेले चिनी  रॉकेट 4 मैल प्रति सेकंद या वेगाने पृथ्वीकडे येत आहे. या रॉकेटला त्यांनी 2021-035 हे नाव दिले आहे.

जगातील या शहरांना रॉकेटचा संभाव्य धोका

चिनी अंतराळ तज्ञांचे नियंत्रण गमावून भरकटलेले राक्षसी रॉकेट प्रचंड वेगाने पृथ्वीकडे येत आहे. नियंत्रण गमावल्यामुळे ते नियोजित कार्यक्रमानुसार समुद्रात पाडणे आता शक्य होणार नाही. चिनी सॅटेलाईटच्या मार्गावर न्यूयॉर्क, माद्रिद, बीजिंग या प्रमुख शहरांसह चिली, न्यूझीलंड हे देश आहेत. या भागात हे रॉकेट कुठेही कोसळू शकते. नागरी वस्ती असलेल्या भागात रॉकेट कोसळण्याची भीती अधिक आहे. मात्र, पृथ्वीच्या जवळ आल्यानंतर या रॉकेटचा बराचसा हिस्सा जळून खाक होणार आहे.