कोयना धरात तब्बल 45.30 टीएमसी पाणीसाठा, वीजनिर्मितीसह सिंचनाचे नो टेन्शन!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोयना धरणाच्या तांत्रिक वर्षपूर्तीला केवळ एक महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. धरणात तब्बल 45.30 टीएमसी मुबलक पाणीसाठा शिल्लक असल्याने आगामी काळातील पश्चिमेकडील वीजनिर्मिती व पूर्वेकडे सिंचनासाठीची चिंता मिटली आहे. याशिवाय 1 जूनपासून सुरू होणाऱया नव्या तांत्रिक वर्षारंभाला येथे सरासरी 15 ते 20 टीएमसी पाणी शिल्लक राहण्याची शक्यता असून, जून महिना व जुलैच्या पहिल्या पंधरवडय़ापर्यंत पाण्याची काळजी नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

105.25 टीएमसी पाणी साठवणक्षमता असलेल्या कोयना धरणात गतवर्षी 131.63 टीएमसी पाण्याची आवक झाली होती. गतवर्षीच्या शिल्लक साठय़ासोबत नव्याने आलेल्या पाण्यातील 23.99 टीएमसी पाणी हे विनावापर पूर्वेकडे सोडण्यात आले. पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी 55.26 टीएमसी पाणीवापर झाला. यासाठी 67.50 टीएमसी पाणी आरक्षित असते. आता आगामी एका महिन्यासाठी शिल्लक 12.24 टीएमसी पाण्यावर अपेक्षित अखंडित वीजनिर्मिती होऊ शकते.

सिंचनासाठी गेल्या काही वर्षांत पाण्याची मागणी वाढली आहे. सरासरी 18 ते 20 टीएमसीची गरज गेल्या चार वर्षांत जवळपास 36 टीएमसीवर गेली आहे. एकूणच आगामी एका महिन्यासाठी पश्चिमेकडील आरक्षित 12.24, सिंचनासाठी 8.39, मृत साठा 5 असा मिळून 25.63 टीएमसीचा वापर लक्षात घेता व सिंचनासाठी जादा पाण्याची गरज लागली तरीही कोयना धरणात सध्या शिल्लक 45.30 टीएमसी पाण्यामुळे 1 जूनपासून सुरू होणाऱया नव्या तांत्रिक वर्षारंभाला येथे सुमारे 15 ते 20 टीएमसी पाणी शिल्लक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिंचनासह वीजनिर्मितीलाही अडथळा राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.