
पालिकेने मुंबईकरांच्या लसीकरणासाठी तब्बल एक कोटी डोस खरेदी करण्यासाठी ग्लोबल टेंडर काढले आहे. येत्या आठ दिवसांत यासाठी निविदा अंतिम करण्यात येणार आहे. अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी ही माहिती दिली. दरम्यान, मुंबईत परदेशातून लस आली तर तीन आठवडय़ांत मुंबईकरांचे लसीकरण पूर्ण करू, असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी कालच जाहीर केले होते. शिवाय डोससाठी जागतिक निविदा काढाव्यात, अशा सूचनाही पालिका प्रशासनाला दिल्या होत्या.
मुंबईत दररोज एक लाख डोस देण्यासाठी पालिकेने लसीकरण केंद्रे, मनुष्यबळ आणि आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मात्र पुरेशा प्रमाणात डोस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण काहीसे मंदावले आहे. खासगी केंद्रांमध्ये लसीकरण बंद आहे. त्यामुळे जागतिक टेंडर काढून जास्तीत जास्त डोस उपलब्ध करण्याची मागणी करण्यात येत होती. पालिका आयुक्तांनी याबाबत दोन दिवसांपूर्वीच सूतोवाच दिले होते. त्यानुसार पालिकेने एक कोटी डोससाठी ग्लोबल टेंडर काढले आहे.
चार कंपन्यांपैकी एकाला संधी मिळणार
पालिकेने ग्लोबल टेंडर काढल्यामुळे फायझर, जॉन्सन अॅण्ड जॉन्सन, स्पुटनिक आणि मॉर्डना अशा कंपनीकडून डोस मिळण्याची शक्यता आहे. यातील चारही कंपन्या परदेशी आहेत. यामधील जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीचा डोस एकदाच घ्यावा लागणार आहे.
अशा अटी पूर्ण कराव्या लागणार
- पुरवठादार कंपनीच्या लसीचा यूएसस्थित ‘एफडीए’ समकक्ष प्राधिकरणाची मंजुरी घ्यावी.
- पालिकेची 20 रुग्णालये आणि 240 केंद्रांवर लस सुरक्षितरीत्या पोहचवण्याची व्यवस्था असावी.
- ‘आयसीएमआर’, ‘डीसीजीआय’च्या निकषांची पूर्तता करणारी असावी.
- कार्यादेश मिळाल्यानंतर तीन आठवडय़ात पुरवठा सुरू करावा
- लसींचा पुरवठा सुरू झाल्यानंतर अचानक पुरवठा खंडित केल्यास दंडात्मक कारवाई






























































