तोक्ते वादळाचे खेडमध्ये दोन बळी; तुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून पतीपत्नीचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तोक्ते चक्रीवादळामुळे तुटून रस्त्यावर पडलेल्या 33 केव्ही वीज वाहिनीचा धक्का बसून बोरज येथील पतीपत्नीचा मृत्यू झाला. ही दूर्घटना सोमवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास बोरज जिल्हा परिषद शाळेजवळ घडली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार बोरज घोसाळकरवाडी येथील प्रकाश गोपाळ घोसाळकर आणि त्यांची पत्नी वंदना प्रकाश घोसाळकर हे दोघे दूचाकीने लोटे येथे गेले होते.

लोटे येथील काम संपवून ते सायंकाळी परतत असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली. त्यांची दुचाकी जिल्हा परिषद शाळा बोरज येथे आली असता वादळामुळे रस्त्यावर तुटून पडलेल्या 33 केव्ही वीज वाहिनीचा जबरदस्त धक्का या दोघांना बसला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची पोलिसांनी नोंद केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत