
कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिका राबवत असलेल्या ‘मुंबई मॉडेल’चे सर्वेच्च न्यायालयापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काैतुक केले आहे. ‘मुंबई मॉडेल’ हे पारदर्शक असून कोरोना मृतांचे आकडे कधीच लपवले गेले नाहीत, असे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या कोरोना प्रतिबंधक लस खरेदीचा आणि लसीकरणाच्या नियोजनाचा आढावा आज आदित्य ठाकरे यांनी पालिका मुख्यालयात घेतला. मुंबईला लस मिळाल्यास 60 दिवसांत सर्वांचे लसीकरण पूर्ण करू शकतो. तशी तयारी करण्यात आल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. दरम्यान, मुंबईत मृतांचे आकडे लपवले जात आहेत असा आरोप भाजपने केला होता. त्यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, सर्वेच्च न्यायालयापासून सर्वच स्तरावर ‘मुंबई मॉडेल’चे काैतुक झाले आहे. जे सत्य आहे ते समोर आहे. मुंबई महापालिकेचा कारभार नेहमीच पारदर्शक राहिला आहे. त्यामुळे कोणतेही आकडे लपवले गेलेले नाहीत आणि जाणारही नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
निर्बंध गंमत म्हणून लादलेले नाहीत
‘ब्रेक द चेन’अंतर्गत राज्यातील निर्बंध शिथिल करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. दुसऱया लाटेसाठी निर्बंध लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. त्यावरून राज्य सरकारवर टीकाही होत होती, मात्र कोणीही गंमत म्हणून निर्बंध लादत नाही. कोरोनाची दुसरी लाट गंभीर असल्यामुळे त्याप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.






























































