
कोरोना निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात व्हिजिटर्सच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहे. मात्र आज व्हिजिटर्स आणि व्हीआयपी मंडळीच्या मोटारींनी मंत्रालय गजबजून गेले होते. मोटारींची वाढती संख्या पाहून पोलीसही अचंबित झाले होते.
कोरोनामुळे मंत्रालयात प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. 48 तासांपूर्वीचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. रिपोर्ट निगेटिव्ह असेल तरच मंत्रालयात अतिशय महत्त्वाच्या कामासाठी प्रवेश दिला जातो, पण आज मंत्रालयातील वर्दळ एकदम वाढलेली दिसत होती. मोटारींच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली होती. मंत्रालयात प्रवेश करणाऱया मोटारींवर पिवळा स्टिकर असेल तरच आत मोटार पार्क करण्याची परवानगी आहे, पण मोटारीवर पिवळे स्टिकर्स नसतानाही आतमध्ये मोटारी पार्क केलेल्या दिसत होत्या.
काही कर्मचाऱयांच्या म्हणण्यानुसार सोमवार-मंगळवारी आणि राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या आदल्या दिवशी मंत्रालयात नेहमीच गर्दी वाढलेली असते.
सध्याच्या काळात मंत्रालयात प्रवेशावर निर्बंध आहेत. पण अतिशय तातडीच्या कामासाठी प्रवेश पाहिजे असल्यास मंत्री कार्यालयातून पत्र आवश्यक आहे. पण अनेक व्हिजिटर्स आमदारांच्या मोटारीतून प्रवेश करताना दिसत होते. त्यामुळे मंत्रालयीन कर्मचाऱयांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. कारण सुदैवाने मंत्रालयातील कर्मचारी व अधिकारी वर्गामध्ये कोरोनाचा संसर्ग फैलावलेला नाही. पण व्हिजिटर्सची संख्या वाढली तर कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे, अशा शब्दांत मंत्रालयातील कर्मचाऱयांनी चिंता व्यक्त केली.


























































