
अवघ्या जगाचे लक्ष असलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप) अंतिम सामन्यातील विजेत्या तसेच उपविजेत्या संघासाठी असलेल्या बक्षिसाच्या रक्कमेची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नुकतीच घोषणा केली असून त्यानुसार विजेत्या तसेच उपविजेत्या संघावर कोटय़वधींचा पाऊस पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला आयसीसीकडून मानाच्या गदेसह 1.6 मिलियन अमेरिकन डॉलर म्हणेज 11 कोटी 71 लाख 74 हजार इतकी, तर उपविजेत्या संघाला 8 लाख अमेरिकन डॉलर म्हणजे 5 कोटी 85 लाख 87 हजार रुपये इतकी धनराशी बक्षिसाच्या रूपात देण्यात येणार आहे.
अंतिम सामन्याआधी आयसीसीने विजेत्या आणि उपविजेत्या संघाला मिळणाऱया बक्षिसाची घोषणा केली आहे. विजेत्या संघाला 11 कोटी 71 लाख, तर उपविजेत्या संघाला 5 कोटी 85 लाख रुपयांची धनराशी देण्यात येणार आहे. मात्र हा सामना ड्रॉ (अनिर्णीत) झाला किंवा टाय झाला तर दोन्ही संघांना संयुक्तपुणे विजेते घोषित करण्यात येणार आहे, असे आयसीसीने स्पष्ट केले आहे.
वेगवान गोलंदाजांसाठी पोषक खेळपट्टी?
इंग्लंडमधील खेळपट्टय़ांचा वेगवान गोलंदाजांसाठी पोषक असल्याने त्याचा त्यांना फायदा होत असतो. मात्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी तयार करण्यात आलेली खेळपट्टी ही सर्वांसाठी लाभदायक असून फलंदाज, फिरकीपटू आणि गोलंदाजांना फायदेशीर ठरू शकते, असे क्टुरेटरकडून सांगण्यात आले. मात्र दोन्ही संघांतील गोलंदाजांना ग्रेड वन डय़ुक चेंडूवर गोलंदाजी करण्याचा फारसा अनुभव नाही. त्यामुळे दोन्ही संघांतील खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. तसेच इंग्लंडमधील या खेळपट्टीवर चेंडूला उसळी मिळण्यास मदत होणार असून वेगवान गोलंदाजांसाठी ते फायद्याचे ठरणार आहे.























































